मोठय़ा प्रवासाहून परतल्यावर सामानासह रिक्षा शोधणे हे जिकिरीचे काम असते, मात्र परिवहन विभाग आणि रेल्वे प्रशासन मिळून हे काम हलके करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मुंबई महानगर प्रदेशातील पाच महत्त्वाच्या रेल्वे टर्मिनसबाहेर प्रीपेड रिक्षा सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने परिवहन विभागाने चाचपणी सुरू केली असून, लवकरच ही सेवा कुर्ला टर्मिनस येथे सुरू होण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी परिवहन विभागातर्फे मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस, दादर टर्मिनस, मुंबई सेंट्रल येथे प्रीपेड टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली होती. या सेवेमुळे प्रवाशांना खूप फायदाही झाला. याच धर्तीवर आता कुर्ला टर्मिनस, वांद्रे टर्मिनस, अंधेरी, बोरिवली, ठाणे आणि कल्याण जंक्शन या सहा स्थानकांबाहेर प्रीपेड रिक्षा सेवा सुरू करण्याबाबत विचार सुरू आहे. याबाबतचा प्रस्ताव परिवहन विभागाने रेल्वे विभागाकडे पाठवला. त्यानंतर दहा-बारा दिवसांपूर्वी रेल्वे अधिकाऱ्यांसह बैठकही घेण्यात आली. या बैठकीला मध्य रेल्वेचे अधिकारी होते, मात्र पश्चिम रेल्वेचे अधिकारी नव्हते, असे परिवहन आयुक्त व्ही. एन. मोरे यांनी सांगितले.
प्रीपेड रिक्षा सेवा याआधी पुणे स्थानकाबाहेर सुरू करण्यात आली आहे. या सेवेला प्रतिसादही उत्तम आहे. मात्र त्यासाठी रेल्वेला त्यांच्या जागेपैकी काही जागा द्यावी लागते. तेथे एक बुथ उभारावा लागतो. त्या बुथची जबाबदारी एखादी रिक्षा संघटना किंवा सेवाभावी संस्था यांच्याकडे द्यावी लागते. त्याबाबतचा करारही केला जातो. वाहतूक पोलीस आणि रेल्वे पोलीस यांच्या साहाय्याने प्रीपेड रिक्षांसाठी वेगळी रांगही बनवावी लागते. याबाबत रेल्वेच्या अधिकाऱ्यांसह चर्चा झाली. या चर्चेदरम्यान कुर्ला येथे अशा प्रकारची प्रीपेड रिक्षा सेवा सुरू करण्याबाबत प्रशासनाने उत्साह दाखवल्याचे मोरे म्हणाले. यासाठी आता रेल्वे, परिवहन विभाग, स्थानिक पोलीस आणि रेल्वे पोलीस एकत्रितपणे सर्वेक्षण करणार आहेत.
याच दरम्यान, विविध रेल्वे टर्मिनसपासून विविध ठिकाणचे अंतर मोजले जाईल. या अंतराचे भाडे सध्याच्या दरपत्रकानुसार जेवढे असेल, त्यात २०, २३, २५ असे अंतरानुसार टक्के वाढवून प्रीपेड रिक्षाचे भाडे ठरवले जाईल. प्रीपेड रिक्षा थोडीशी महागडी वाटत असली, तरी प्रवाशांची सुरक्षा आणि खात्रीलायक प्रवास यांसाठी हा उत्तम पर्याय आहे. स्थानकातून बाहेर पडल्यानंतर रिक्षावाल्यांची मिनतवारी करण्याऐवजी प्रीपेड रिक्षाचा पर्याय प्रवाशांना नक्कीच फायद्याचा ठरेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First pay then sit in the rikshaw