नवरात्रोत्सव व पाठोपाठ येणारी दिवाळी या काळात खाद्यतेल तसेच इतर अन्न पदार्थामध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. त्या अंतर्गत शिंदे येथील लिबर्टी ऑईल मीलवर छापा टाकून साडे चार लाख रूपयांचा माल जप्त करण्यात आला.
सणोत्सवाच्या काळात अन्न पदार्थाची भेसळ मोठय़ा प्रमाणात वाढते, असा अनुभव आहे. ही बाब लक्षात घेऊन भेसळयुक्त अन्न पदार्थाची खरेदी-विक्री होऊ नये यावर या विभागाने लक्ष केंद्रीत केले आहे. निर्मिती व विक्री होणाऱ्या अन्न पदार्थाची गुणवत्ता तपासणी करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेचा भाग म्हणून शिंदे येथील लिबर्टी तेल कंपनीत छापा टाकण्यात आला. या ठिकाणी वनस्पती (पफमेकर), वनस्पती (शिल), इम्पोर्टेड रिफाइन्ड सोयाबिन आईल (अंबर), इम्पोर्टेड रिफाईन्ड पामेलिन (अ‍ॅकर) असे एकूण पाच नमुने अन्न सुरश्रा व मानके कायद्यानुसार विश्लेषणासाठी ताब्यात घेण्यात आले. या सर्व मालाची किंमत चार लाख ५१, ९३५ रूपये असल्याची माहिती या विभागाने दिली आहे. या विभागाचे सहआयुक्त (अन्न) चंद्रकांत पवार व सहाय्यक आयुक्त (अन्न) ज्ञानेश्वर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी नितीन मोहिते, राहुल ताकाटे व राजू आकरूपे यांच्या पथकाने पार पाडली. सणोत्सवाच्या काळात खरेदी मोठय़ा प्रमाणावर होत असल्याने भेसळयुक्त अन्न पदार्थाच्या विक्रीचा संभव असतो.
काही वर्षांपासून मिठाई व तत्सम पदार्थासाठी भेसळयुक्त खवा आसपासच्या भागासह शेजारील राज्यातून आणला जात असल्याचे प्रकार उघड झाले आहे.
दिवाळीला महिनाभराचा कालावधी राहिला असताना या विभागाने अन्नपदार्थाची विक्री करणाऱ्यांचे तपासणी सत्र सुरू केले आहे.