नागपूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या दिवाळी स्नेहमीलन समितीच्या वतीने रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये बुधवार, ६ नोव्हेंबरला सायंकाळी ६.४५ वाजता दिवाळी स्नेहमिलन आणि ‘एनसीसीएल अवॉर्ड २०१३’ सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या स्नेहमीलन सत्कार सोहळा कार्यक्रमात उद्योग, व्यापार आणि सेवा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे.
उद्योग क्षेत्रातून कॉन्फिडन्स समूहाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक नितीन खारा, व्यापार क्षेत्रात योगदान देणारे वेडोम्सचे व्यवस्थापकीय संचालक वेदप्रकाश जयस्वाल आणि सेवा क्षेत्रात गोयलगंगा समूहाचे अध्यक्ष जयप्रकाश गोयल यांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे सचिव राजेश अग्रवाल आणि विशेष पोलीस महानिरीक्षक राजेंद्रसिंह उपस्थित राहणार आहेत. एनसीसीएल ही सर्वात जुनी व्यापारी संस्था असून १९३२ साली स्थापन करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या संयोजनाची जबाबदारी संस्थेचे संचालक महेशकुमार अग्रवाल यांच्यासह विजय जयस्वाल, आशीष जेजानी, समीर गुप्ता, मनीष ओझा, नाथाभाई पटेल आणि रवींद्र पडगिलवार यांच्यावर सोपविण्यात आली आहे.