देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या क्रांतीविरांनी प्राणाची आहुती दिली त्यांची नावे नव्या पिढीला माहीत नसून इतिहास विसरत चाललो आहोत. नव्या पिढीपर्यंत हा इतिहास पोहोचविण्याचे आणि जपण्याचे काम ज्येष्ठ नागरिकांनी करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत मधुकर भावे यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान केंद्र आणि राष्ट्रवादी अकादमी फॉर स्पोटर्स कल्चरल अॅण्ड एज्युकेशन या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आजीवन लोकसेवेचे व्रत घेऊन काम करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार खासदार विजय दर्डा आणि मधुकर भावे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला.
साई सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे विभागीय अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष अजय पाटील उपस्थित होते.
या कार्यक्रमात ज्येष्ठ चित्रकार डी.के. मनोहर, अरुण मोरघडे, गायिका डॉ. उषा पारखी, समाजसेवक हरीश अडय़ाळकर, लीलाताई चितळे, उमेश चौबे, सहकार नेते अण्णाजी मेंडजोगे, योगतज्ज्ञ रामभाऊ खांडवे, ध्वनिमुद्रक दामू मोरे, छायाचित्रकार जयंत हरकरे, प्रहारचे प्रमुख कर्नल सुनील देशपांडे, नेपथ्यकार गणेश नायडू, कवयित्री आशा पांडे, नेत्रतज्ज्ञ ओ.एल. राठी व निर्मला राठी, नकलाकार राजाभाऊ चिटणीस, शेवाळकर संगीत महाविद्यालयाचे प्राचार्य पं. प्रभाकरराव देशकर, हिंदीचे साहित्यिक शेख मोहंमद हाशीम, डॉ. प्रणोती चक्रवर्ती यांचा सत्कार करण्यात आला.
ज्येष्ठ नागरिक ही समाजाची देणगी आहे. आज घरे तुटत चालली आहेत. आई-वडिलांकडे वेळ देण्यास मुलांना वेळ नाही त्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक नैराश्याचे जीवन जगत आहेत. ज्येष्ठ नागरिक समाजाचे दीपस्तंभ असून त्यांचा सत्कार हा त्यांच्या त्यागाचा सत्कार आहे, असेही भावे म्हणाले. यावेळी विजय दर्डा यांचे भाषण झाले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गिरीश गांधी यांनी केले.  संचालन डॉ. सुनील रामटेके यांनी केले.