सध्याच्या भेडसावणाऱ्या समस्यांवर संविधान हाच पर्याय असल्याचे प्रतिपादन येथे सुरू असलेल्या महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता पर्वाच्या  पहिल्या विचार वेध सत्राचे अध्यक्ष देवेंद्र वालदे यांनी केले. यावेळी जी.एस कांबळे प्रमुख मार्गदर्शक होते. चातुर्वण्य व्यवस्थेवर त्यांनी घाणाघाती हल्ला केला. ज्ञानबंदी, धनबंदी आणि शस्त्रबंदीबाबत त्यांनी गर्जना केली अन् त्याचवेळी आकाशात नभ गर्जनांना प्रारंभ झाला. जसा जसा वक्त्यांच्या आवाजातील आरोह-अवरोह वाढत होता तस तसा आसमंतही ढगांच्या गडगडांनी गर्जून लागला होता.
देवेंद्र वालदे श्रोत्यांना उदेशून म्हणाले, आकाशात विजा चमकत आहेत. धो-धो पावसाची शक्यता आहे, पण हा पाऊस आपल्या विचारांना घाबरतो. तो येणार नाही, मात्र निसर्गाने वालदे यांचे काही एक ऐकले नाही. त्याने धरतीला ओले करून व सर्वांना धुवून काढले. पावसाचा राग शांत झाल्यावर आयोजकांनी वादळ वाऱ्यांची पर्वा न करता दुसरे सत्र सुरू केले.
 भटक्या व आदिवासींच्या प्रगतीचा लेखाजोखा या दुसऱ्या विचारवेध सत्राचे अध्यक्ष डॉ. टी.सी राठोड, तर प्रमुख वक्ते होते उत्तमराव गेडाम. मोहंजदडो येथे आदिवासींची विकसित संस्कृती होती. भारतात स्वातंत्र्यापूर्वी १ हजार ६५२ आदिवासी बोलीभाषा होत्या. आज त्यांची संख्या फक्त २३४ झाली आहे.
आज भारतात आयपीएल, एपीएल, बीपीएल, अशी तीन प्रकारची माणसे राहतात. आयपीएलची ८० टक्के साधन संपत्तीवर आहे, असे मत त्यांनी मांडले.
तिसऱ्या विचारवेध सत्राचा विषय होता ओबीसींच्या सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया व संतांचे योगदान. अध्यक्षस्थानी उत्तमराव हुड गुरुजी, तर प्रमुख वक्ते म्हणून विजय गवळी, सुधीर सुर्वे आणि प्रा. काशिनाथ लाहोरे होते. संत तुकारामाच्या क्रांतिकारी विचारांना विजय गवळी यांनी उजाळा दिला. अभंग आणि अखंडाच्या समन्वयातून महात्मा फुलेंनी संत तुकारामाचा आदर्श स्वीकारला, असे मत त्यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रात झालेले सर्व समाजसुधारक हे संतच होते, असे प्रतिपादन सुधीर सुवेर्ंनी केले. बाराव्या शतकातील चक्रधरांपासून, नामदेव, तुकाराम ते आधुनिक युगातील समाजसुधारकांनी ओबीसींसाठी केलेल्या कार्याचा आढावा त्यांनी घेतला. संचालन प्रा. सलीम चव्हाण, प्रमोद घोडाम आणि नीलेश शिंदे यांनी केले. विलास काळे यांनी आभार मानले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Huge public response in phule ambedkar samta concern in yeotmal