अनधिकृत बांधकामाचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंब्य्रात नव्याने उभी राहणारी बेकायदा बांधकामे वाचविण्यासाठी भूमाफिया आता सर्रासपणे प्रार्थनास्थळाचा आधार घेत असल्याची माहिती पुढे येऊ लागली आहे. शीळ येथील लकी कंपाउंड दुर्घटनेनंतर या सगळ्या परिसरात अशी बांधकामे होऊ नयेत, यासाठी महापालिका आणि पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली होती. काही काळ अशा बांधकामांना अंकुश बसल्यानंतर पुन्हा एकदा बेकायदा इमल्यांची उभारणी या परिसरात होऊ लागली असून त्यासाठी प्राथर्नास्थळ असल्याची आवई उठवली जात आहे. बेकायदा बांधकामाचा पाया रचायचा आणि त्यावर कारवाई करण्यासाठी महापालिकेचे पथक आलेच तर प्रार्थना स्थळ असल्याचा दावा करत आक्रमक व्हायचे, असा नवा फंडा भूमाफियांनी शोधून काढला आहे.
मुंब्य्राला खेटूनच असलेल्या शीळ-डायघर येथील लकी कंपाऊंडमधील अनधिकृत इमारत दुर्घटनेनंतर नव्याने उभी राहणाऱ्या अनधिकृत बांधकामांना आळा बसेल, अशी आशा होती. या दुर्घटनेत महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना तुरुंगाची हवा खावी लागली,
तर काही पोलीस कर्मचारीही चौकशीच्या गर्तेत सापडले. त्यामुळे अनेक वर्षे अशा बांधकामांच्या पायावर पोसली गेलेली ही भ्रष्ट यंत्रणा यापुढे तर दक्ष राहील, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. सुरुवातीच्या काळात तसे झालेही. मुंब्राच नव्हे तर दिवा, कळवा अगदी बेलापूरपट्टीतही अशा बांधकामांवर अंकुश बसला. लकी कंपाउंड दुर्घटनेला वर्ष उलटताच
पुन्हा सगळे पूर्ववत झाल्याचे चित्र दिसू लागले असून या सगळ्या परिसरात जोमाने बांधकामे सुरू झाली आहेत.
गेल्या आठवडय़ात मुंब्रा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त डॉ. सागर घोलप यांच्यावर जीवघेण्या हल्ल्याचा प्रयत्न झाला. मुंब्रा बाह्य़वळण मार्गाजवळील टोलनाका परिसरातील अनधिकृत बांधकामाची पाहाणी करण्यासाठी आणि संबंधितांना नोटीस बजावण्यासाठी डॉ. घोलप आणि त्यांचे पथक घटनास्थळी गेले होते. त्यावेळी अनधिकृत बांधकाम वाचविण्यासाठी जमलेल्या भूमाफियांनी डॉ. घोलप आणि त्यांच्या पथकावर हल्ला केला. त्यांच्या तावडीतून सुटका करत घोलप यांनी पळ काढला. सुमारे अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत जमावाने त्यांचा पाठलाग केला होता. भूमाफियांच्या दहशतीमुळे घोलप आणि त्यांचे पथक भेदरलेले आहे. या कारवाईदरम्यान, भूमाफियांनी संबंधित बांधकाम प्रार्थनास्थळ असल्याचा दावा करत ते तोडण्यासाठी महापालिकेचे पथक आले असल्याची ओरड केली होती. यातून एका समाजाला एकत्र करून महापालिकेच्या पथकावर हल्ला करण्यास प्रवृत्त केले होते.
यापूर्वीही मुंब्य्रातील अनेक अनधिकृत बांधकामांच्या कारवाईदरम्यान भूमाफियांचा हा
फंडा निदर्शनास आला आहे, अशी माहिती महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. एखादे प्रार्थनास्थळ बेकायदा असेल तरी त्यावर कारवाई व्हायलाच हवी. मात्र, मोकळ्या भूखंडावर लहानसे प्रार्थनास्थळ उभारायचे आणि मागील बाजूस
इमारतीचे इमले उभे करायचे, असा प्रकार या भागात सर्रासपणे सुरू असल्याची माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 29th Jul 2014 रोजी प्रकाशित
मुंब्य्रात बेकायदा बांधकामांना प्रार्थना स्थळाचा पाया
अनधिकृत बांधकामाचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंब्य्रात नव्याने उभी राहणारी बेकायदा बांधकामे वाचविण्यासाठी भूमाफिया आता सर्रासपणे प्रार्थनास्थळाचा आधार घेत असल्याची माहिती

First published on: 29-07-2014 at 06:06 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Illegal construction in mumbra