पाणी टंचाईच्या समस्येवर मात करीत शेततळ्यांच्या माध्यमातून पिके वाचविण्यासाठी धडपडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काहीशा निष्काळजीपणामुळे ही शेततळे म्हणजे ‘मौत का कुंवा’ बनू लागली आहेत. सहा महिन्यात शेततळ्यांमध्ये बुडून जिल्ह्यातील सहापेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला असून या संकटावर मात करण्यासाठी शेततळ्यांमध्ये काही उपाययोजना करण्याची सूचना शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
पावसाळ्याच्या पाश्र्वभूमीवर शेतकऱ्यांकडून शेततळी पूर्ण भरण्याचे काम सुरू होईल. हे काम करताना खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. शेततळ्यांची खोली आणि प्लास्टिक यामुळे धोका निर्माण होत आहे. या प्लास्टिकवरून घसरून शेततळ्यात बुडण्याचे प्रकार घडले आहेत. शेततळ्यात बुडाल्यावर पोहता येणाऱ्यांनाही बाहेर पडण्यासाठी कोणतीही सुविधा नसल्याने प्राण जाण्याच्या घटना घडल्याने शेततळ्यांपासून निर्माण होणारा धोका दूर करण्यासाठी उपाय करणे आवश्यक झाले आहे. निफाड तालुक्यातील सुकेणे येथील रामचंद्र जाधव यांनी यासंदर्भात एक उपाय सुचविला आहे. शेततळ्याच्या खोलीपर्यंत चारही बाजूंनी सर्कशीत असते त्याप्रमाणे दोरीची शिडी टाकण्यात यावी.
तिचे दुसरे टोक शेततळ्याच्या काठाला घट्ट बांधलेले असावे. या उपायामुळे शेततळ्यात एखादी व्यक्ती घसरून पडली तरी या शिडीच्या आधारे तिला बाहेर येणे किंवा वाचविता येणे शक्य आहे. सद्यस्थितीत शेततळ्यात घसरून पडल्यास सर्व बाजूंनी प्लास्टिक राहात असल्याने बाहेर येण्याचा कितीही प्रयत्न केला तरी प्लास्टिकमुळे पाय घसरत असल्याने ते शक्य होत नाही. शेतकऱ्यांनी सावधगिरीचा उपाय म्हणून आपल्या शेततळ्यांमध्ये अशा प्रकारची उपाययोजना करून धोका टाळावा अशी सूचनाही जाधव यांनी केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 13th Jun 2014 रोजी प्रकाशित
शेततळ्यांमध्ये घसरून पडण्याच्या घटनांमध्ये वाढ
पाणी टंचाईच्या समस्येवर मात करीत शेततळ्यांच्या माध्यमातून पिके वाचविण्यासाठी धडपडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काहीशा निष्काळजीपणामुळे ही शेततळे म्हणजे ‘मौत का कुंवा’ बनू लागली आहेत.
First published on: 13-06-2014 at 01:34 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Incident of sliding increase in farm lake