गेल्या अडीच महिन्यांत सर्पदंशाचे २००पेक्षा अधिक रुग्ण घाटी रुग्णालयात दाखल झाले. गेल्या आठ दिवसांत १६ रुग्ण दाखल झाले. यातील एकाचा मृत्यू झाला, तर एक रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे. सर्पदंशाचे प्रमाण लक्षणीय वाढले. मात्र, त्यावरील औषधाची मात्रा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याचे घाटी रुग्णालयाच्या प्रशासनाने सांगितले.
मराठवाडय़ातील भीषण दुष्काळामुळे जमिनीला अक्षरश: भेगा पडल्या. पाऊस आला आणि गावोगावी सर्पदंशाच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली. गेल्या अडीच महिन्यांत २००पेक्षा अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले. मात्र, उपचार करताना ‘अँटीस्नॅक व्हिनॉम’ ही औषधाची मात्रा रुग्णांना हव्या त्या प्रमाणात देता येत नाही. सर्पदंशावर उपचारासाठीचे औषध हाफकिन इन्स्टिटय़ूटमध्ये बनविले जाते. गेल्या काही दिवसांपासून ही संस्था बंद होती. त्यामुळे पुरेशा प्रमाणात औषधे मिळू शकली नाहीत. दाखल रुग्णांनाही पुरेशी मात्रा दिली नाही, तरीही सुदैवाने रुग्ण वाचले.
बऱ्याचदा बिनविषारी साप चावल्यानंतरही घाबरून रुग्णाचा मृत्यू होतो. घाटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करताना वेगवेगळय़ा प्रकारे काळजी घेतली जाते. घाटीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गट्टाणी म्हणाले, की सर्पदंशाच्या औषधाचा पुरवठा तसा कमीच असतो. गुरुवारी औषधाच्या २०० मात्रा उपलब्ध झाल्या. पण आवश्यकतेपेक्षा त्या कमीच आहेत. त्यामुळे जेथे औषध उपलब्ध असेल तेथून मागून घेऊन कसेबसे भागविले जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase standard of snake bite shortage of medicines