गणेश विसर्जनास अवघे दोन दिवस बाकी असताना मिरवणूक मार्गावरील विद्युत तारांबाबत योग्य ती कार्यवाही, दुकानांसमोरील अतिक्रमणे हटविणे, सर्व खड्डे तातडीने बुजवावे, असे निर्देश महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांनी दिले. गणपती विसर्जनासाठी मिरवणूक मार्गावर सुरू असलेल्या तयारीचा आढावा सोमवारी महापौरांनी घेतला.
वाकडीबारव येथून पंचवटीतील गोदावरी नदीपर्यंतची पाहणी महापौरांनी पालिका अधिकाऱ्यांसमवेत केली. मेनरोड ते रविवार कारंजा येथील काही भागात विद्युततारा अतिशय खालच्या भागातून गेल्या आहेत. मिरवणुकीप्रसंगी त्या धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे ज्या ठिकाणी विद्युततारा अतिशय खालून गेल्या आहेत, त्या शक्य असल्यास भूमिगत करणे, अथवा त्यातील विज प्रवाह खंडित करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश अ‍ॅड. वाघ यांनी दिले. मिरवणूक मार्गावरील अनेक दुकानांसमोर वेगवेगळ्या स्वरूपाची अतिक्रमणे करण्यात आली आहे. ही बाबही अडथळा ठरणार असल्याचे दिसत आहे. ही सर्व अतिक्रमणे त्वरित हटविण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या मार्गावर खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले असले तरी ते तातडीने पूर्णत्वास नेण्याचे सूचित करण्यात आले आहे.
दरम्यान, महापालिकेच्यावतीने गणेश विसर्जनासाठी शहरातील सहाही विभागात २७ ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली असून त्याचा गणेशभक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या शिवाय, मूर्ती दान करण्याचा उपक्रम व निर्माल्य संकलनाची व्यवस्था केली जाणार आहे. ज्या मूर्ती महापालिका संकलीत करणार आहे, त्यांचे विधीवत पूजन करून विसर्जन केले जाईल. तसेच गणेश विसर्जनासाठी साईनाथनगर चौक, किशोरनगरसमोर, रामदास स्वामी नगर, वन विभाग रोपवाटीका पूल, गोदापार्क जॉगिंग ट्रॅक, चव्हाण कॉलनी (गोदा पार्कजवळ), दोंदे पूल (उंटवाडी पूल), येवलेकर मळा, शिवसत्य क्रिडा मंडळ मैदान, महात्मा नगर पाण्याच्या टाकीजवळ, लायन्स क्लब गार्डन – पंडित कॉलनी, आरटीओ जवळील गोरक्षनगर, अश्वमेधनगर, कोणार्कनगर, गोपाळनगर, महापालिका शाळा क्रमांक १२५, शिखरेवाडी मैदान, राजे संभाजी स्टेडिअम, गोविंदनगर न्यू इरा स्कूल, पिंपळगाव खांब (वालदेवी नदीवरील घाट परिसर), पवननगर स्टेडिअम, प्रशांतनगर महपालिका शाळा (पाथर्डी फाटा), पाईपलाईन रोड कॅनॉलजवळ (व्हिस्डम हायस्कूल मैदान), अशोकनगर पोलीस चौकी, शिवाजीनगर या ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे.