वेगवेगळ्या कारणांनी गाजलेल्या जळगाव महापालिका निवडणुकीची मतमोजणी प्रक्रियाही तितकीच रोमहर्षक ठरली. कडेकोट पोलीस बंदोबस्तात सुरू झालेल्या मतमोजणीबद्दल सर्वच उमेदवार व समर्थकांमध्ये प्रचंड हुरहूर अन् उत्कंठता होती. मतपेटीतील कल जसजसे स्पष्ट होऊ लागले तसतसे कुठे जल्लोष तर कुठे निराशेचे मळभ दाटल्याचे पहावयास मिळाले. यावेळी दगडफेड करत गोंधळ घालू पाहणाऱ्यांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.
शहरापासून साधारणत: सहा ते सात किलोमीटर अंतरावरील कुसुंबा औद्योगिक वसाहतीत सोमवारी सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरूवात झाली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. मतमोजणीची ही प्रक्रिया काहिशा लांब अंतरावर असल्याने शहरातील दैनंदिन व्यवहारांवर त्याचे थेट सावट पडले नाही. निवडणूक निर्णय अधिकारी तथा पालिका आयुक्त संजय कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया सुरू झाली.
यावेळी धुळ्याचे जिल्हाधिकारी प्रकाश महाजनही उपस्थित होते. जळगाव-औरंगाबाद रस्त्यावरील या मतमोजणीविषयी प्रचंड उत्सुकता होती. महामार्गावर हजारो समर्थक व नागरिकांनी गर्दी केली होती. त्याचा परिणाम महामार्गावरील वाहतुकीवर होत असल्याने पोलिसांनी औद्योगिक वसाहतीतील मोकळ्या परिसरात समर्थकांना सोडण्यास परवानगी दिली. परंतु, ही बाब नंतर त्यांची डोकेदुखी ठरली. कारण, मत मोजणी केंद्राबाहेर पोहोचलेला हा जमाव नंतर नियंत्रणाबाहेर गेला.
 ध्वनीक्षेपकावरून नीट आवाज येत नसल्याने काही जणांकडून हुल्लडबाजी सुरू झाली. काही कार्यकर्ते ध्वनीक्षेपकाच्या खांबावर चढले. परिणामी, अशा कार्यकर्त्यांना पोलिसांना दंडुक्याचा प्रसाद द्यावा लागला. परंतु, त्याचा उलटा परिणाम झाला. जमावाने अधिक आक्रमक होत दगडफेक सुरू झाली. यावेळी प्रचंड गोंधळ उडाला. अखेर पोलिसांनी बळाचा वापर केल्यावर परिस्थिती नियंत्रणात आली.
दुसरीकडे या गोंधळात राजकीय पक्ष व उमेदवारांचे समर्थक निकालाचा कानोसा घेत होते. कोण पुढे आहे, कोण मागे, कोणत्या पक्षाच्या पारडय़ात किती जागा पडू शकतात, यांचे अंदाज बांधले जात होते. दीड तासांच्या प्रतीक्षेनंतर म्हणजे सकाळी साडे अकराच्या सुमारास पहिला अधिकृत निकाल जाहीर झाला. त्यानंतर एक एक करून निकाल जाहीर होऊ लागले. खांदेश विकास आघाडी आणि भाजप यांच्यात कडवी झुंज सुरू असल्याचे लक्षात येत होते.
 मनसे जोरदार मुसंडी मारत असताना राष्ट्रवादीची घसरगुंडी होत असल्यावर समर्थकांमध्ये खल सुरू होता. काँग्रेसला एकही जागा मिळत नसल्याचे पाहून त्यांचे उमेदवार व समर्थकांनी बेमालुमपणे घरचा रस्ता धरला. तशीच अवस्था समाजवादी पक्षाच्या उमेदवारांची झाल्याचे पहावयास मिळाले. विजयी झालेल्या उमेदवारांच्या समर्थकांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला तर पराभूत उमेदवारांच्या चेहेऱ्यावर निराशेची छाया पसरली होती. मतमोजणीचे वैशिष्ठय़े म्हणजे, समर्थकांनी केंद्राबाहेर धुडगूस घातला असला तरी आतमध्ये चाललेल्या मतमोजणीवर उमेदवारांकडून कोणतेही आक्षेप नोंदविले गेले नाही.