पतंग व मांजाच्या दुकानात गर्दी
मकरसंक्रांतीला शहरातील विविध भागात पतंगाचा माहोल असतो. सर्वत्र ‘ओ..काट’चा आवाज दुमदुमणार. त्यासाठी मांजा आणि पतंग तयार करणाऱ्या दुकानदारांकडे बालकांसह मोठय़ांचीही गर्दी होऊ लागली आहे. नागपुरात पतंगाची मोठी बाजारपेठ असून मकरसंक्रातीच्या निमित्ताने विदर्भात सुमारे दोन कोटी रुपयाची उलाढाल होत असल्याची माहिती पतंग व्यावसायिकांनी दिली.
विविध आकारातील पतंग व मांजाने दुकाने सजली आहेत. नागपुरात जुनी शुक्रवारी, बेझनबाग, यादवनगर, तांडापेठ व इतवारी या भागात पतंग तयार करण्याचे कारखाने असून वर्षभर ते हाच उद्योग करीत असतात. थंडी कडाडली असून वाराही वाहू लागला आहे. आकाशात पतंग दिसू लागले आहेत. मकर संक्रातीला बालकांपासून प्रौढांपर्यंत प्रत्येकजण पतंग उडविण्याचा आनंद घेत असतात. जुनी शुक्रवारी आणि इतवारी भागातील पतंग आणि मांजाची बाजारपेठ सजली असून तेथे नागरिकांनी गर्दी केली आहे. पतंग आणि मांजा तयार करण्याचा व्यवसाय पिढीजात असून वर्षभर हा व्यवसाय केला जातो. दिवाळीनंतर या कामाला गती मिळत असते. कारागिरांबरोबरच कुटुंबातील सर्व सदस्य पतंग तयार करण्यात व्यस्त असतात. नागपुरात विविध आकारातील एक-एक लाख पतंग नागपूरसह विदर्भ, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ या राज्यात विकल्या जातात. साधारणत १५ ते २० मिनिटे एक पतंग तयार करण्यासाठी लागतात. नागपूर पतंगाची मोठी बाजारपेठ असून सुमारे दोन कोटी रुपयांची उलाढाल होत असते. बाजारात अग्नी, संकल आठ, महासंकल आठ, गेंडा, हातोडा, कलिंगडा, संकल अशा नावाचे मांजे विक्रीला आले आहेत.  मांजाची निर्मिती करणारे कारागीर सध्या व्यस्त आहेत. अनेकांनी त्यांच्याकडे आगाऊ मागणी नोंदविली आहे. चांगला मांजा तयार करण्यासाठी स्पर्धा लागली आहे.
जुनी शुक्रवारी भागात पतंग व मांजाने दुकाने सजली आहेत. दुकानांमधील चक्रींवर चमकणारे लाल, गुलाबी, निळा, पिवळा, असे विविध रंग सवार्ंना आकर्षित करीत आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी मांजाच्या किमतीत वाढ झाली असून मांजा भरलेल्या चक्रीला यावर्षी मोठी मागणी आहे. विविध कंपन्यांचे दोरा असलेले रील घेऊन वस्तीवस्तीमध्ये मांजा तयार करण्याचे प्रमाण कमी झाले असून मांजा भरलेली चक्री खरेदीचा प्रघात वाढला असल्याचे या दुकानदारांनी सांगितले. एका चकरीमध्ये पाच चे सहा रील मांजा असून साडेतीनशे रुपयांपर्यंत ती विकली जाते. विविध आकारातील रंगबेरंगी पतंग पाच रुपयापासून चारशे रुपयांपर्यंत विक्रीला आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Makar sankranti celebration in nagpur