कोणत्याही चळवळीची सुरुवात छोटीच असते. दिवसागणिक विचारांचं, कृतीचं खत त्याला मिळतं आणि हळूहळू ती चळवळ जोम धरू लागते, वाढू पाहते. पण दिवसागणिक वाढताना बदलत्या काळाचे भान ठेवून तिची दिशादशा बदलती राहिली तरच ती समकालिनांचे बोट धरून पुढे पुढे जात राहते, नाहीतर काळाच्या ओघात हरवून इतिहासाचा भाग होऊन बसते. हे सगळं यानिमित्ताने सांगावंसं वाटतं, कारण शंभर वर्षांच्या भारतीय चित्रपंढरीने आपल्या वाटचालीत असे अनेक प्रवाह आपलेसे क रून घेतले. ‘सिनेमा’ला कोणतीही चौकट उरली नाही. बॉलीवूडचा सिनेमा आपला होताच, पण हॉलीवूडचा सिनेमाही आपलासा झाला आणि त्यापाठोपाठ ‘आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवां’च्या निमित्ताने देशोदेशीचा सिनेमाही आपल्या प्रेक्षकांनी आपलासा करून घेतला. या आंतरराष्ट्रीय चित्रपटांची ओळख प्रेक्षकांना पहिल्यांदा करून दिली ती या चित्रपट महोत्सवांनी. यात प्रामुख्याने ‘मुंबई अॅकॅडमी ऑफ मूव्हिंग इमेजेस’ (मामि)चा उल्लेख करावा लागेल. हिंदी चित्रपटसृष्टीतील निर्माते, कलाकार आणि सिनेमाप्रेमी यांनी एकत्र येऊन लावलेले हे ‘मामि’चे रोपटे आज या शहराची एक सांस्कृतिक ओळख झाली आहे. सामान्यांना आंतरराष्ट्रीय चित्रपट बघण्याची संधी देणाऱ्या या महोत्सवांनी सिनेमाप्रेमींना आपल्याकडे खेचून आणले आणि आता हे दोघे एकत्र नांदणार असे वाटत असतानाच ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरण करा’ या तत्त्वाप्रमाणे हा ‘मामि’ चित्रपट महोत्सवही कॉर्पोरेट्सना आंदण देण्यात आला. ‘कॉर्पोरेट’करण झाल्याने महोत्सवाच्या आयोजनासाठी बक्कळ पैसा आला. त्याचा फायदा अनेक अर्थाने अगदी ऑस्करचे तज्ज्ञ इथे येऊन आपला विषय मांडत आहेत, इतका मोठा बदल झाला असला तरी ज्या सामान्यांना हे सिनेमाज्ञान व्हावे असे वाटत होते, तो मात्र या महोत्सवापासून दुरावत चालला आहे. महोत्सवाच्या शुभारंभाच्या दिवशी झालेला गोंधळ असेल किंवा आयोजन नीटनेटके व्हावे यासाठी ‘ऑनलाइन तिकीट’सारखे घाईघाईत केलेले बदल असतील त्यामुळे यातली सहज सुंदरता हरवत चालली आहे, अशी प्रतिक्रिया महोत्सवाला नेहमी हजेरी लावणाऱ्यांमध्ये उमटते आहे.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी मराठी माध्यम प्रतिनिधींना मिळालेल्या वागणुकीबद्दल आणि आयोजनातील ढिसाळपणाबद्दलच्या या मोजक्या प्रतिक्रिया..
*आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांचा विचार करताना तो दोन पातळ्यांवर केला पाहिजे. एक म्हणजे चित्रपट निवडून ते दाखवणारे आणि दुसरे म्हणजे संपूर्ण महोत्सवाचे व्यवस्थापन सांभाळणारे लोक. बऱ्याचदा महोत्सवांमध्ये जो गोंधळ असतो तो हा व्यवस्थापनाच्या पातळीवर असतो हे लक्षात येते. चित्रपट निवडणारी जी टीम असते ती जाणकारांची, तज्ज्ञांची असते. त्यांना जागतिक सिनेमाचे ज्ञान असते. त्यामुळे बऱ्याचदा त्यांच्या पातळीवर चित्रपट निवडून ते महोत्सवासाठी आणण्याची कामगिरी चोख पार पाडली जाते. पण बऱ्याचदा महोत्सवाचे व्यवस्थापन ज्यांच्या हातात आहे ती मंडळी सिनेमाची जाणकारही नसतात किंवा त्यांना त्याविषयी प्रेमही नसते. ‘मामि’ महोत्सवात यावर्षी ऑनलाइन तिकीट घेण्याची पद्धत त्यांनी सुरू केली आहे. खरं तर, कुठेही गेलात की तुम्ही जे काही शुल्क असेल ते भरून तुमचा प्रवेशाचा पास घेता आणि तुम्हाला आवडणारा चित्रपट कोणता आहे? तो किती वाजता आहे ते बघून त्याप्रमाणे तिथे जाऊन बसता.. हीच सरळसोपी पद्धत आहे. पण आता इथेही नीटनेटकेपणा आणण्याच्या नादात ही सोपी पद्धत अवघड करून टाकली आहे.
अशोक राणे, चित्रपट अभ्यासक

* ‘मामि’ चित्रपट महोत्सवाचे गेल्या काही काळात ‘कॉपरेरेट’करण झाले आहे. या प्रकल्पाच्या संयोजनाचे काम करणाऱ्या ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ कंपन्यांच्या मुला-मुलींनी या चित्रपट महोत्सवाचे रूपांतर एका ‘इव्हेंट’मध्ये करून टाकले आहे. एक प्रकारचा आंग्लाळलेपणा तेथील वातावरणात आणि या मुला-मुलींच्या वर्तनात आला आहे. चित्रपट पाहायला येणाऱ्या प्रेक्षकांविषयीही त्यांना आस्था नाही. त्यामुळे मराठी माध्यमांच्या प्रतिनिधींशी त्यांनी गैरवर्तन करणे संतापजनक असले तरी गेल्या काही काळातील त्यांचे वर्तन पाहता आश्चर्य वाटले नाही. ‘मामि’च्या कार्यक्रमांमध्येही कृत्रिम इंग्रजी चटपटीतपणा दिसतो आहे.
दीपक पवार, मराठी अभ्यास केंद्र  

*कोणत्याही चित्रपट महोत्सवात मराठी प्रसिद्धी माध्यमांना दूर ठेवणे निषेधार्ह आहे. मराठी माध्यमांचा तिरस्कार असेल तर महाराष्ट्रात महोत्सव भरवू नये, अन्य राज्यांमध्ये जावे. मराठी भाषा, कला, साहित्य-संस्कृती प्रगल्भ व विशाल आहे. मराठीजनांना दूर लोटूनही मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमाला जाणे, दुर्दैवी आहे. भाषावाद, राजकारण करू नये. मराठी माध्यमांना दूर करणारी डोकी कोणाची, याची चौकशी करण्यात यावी.
विनोद तावडे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते
लघुपटांचे खास आकर्षण
* मुंबई अॅकॅडमी ऑफ मुव्हिंग इमेज अर्थात ‘मामि’
चित्रपट महोत्सवामधील ‘डायमेन्शन्स मुंबई’ हा लघुपटांचा विभाग हे दरवर्षीचे आकर्षण ठरते. जास्तीत जास्त पाच मिनिटे कालावधीचे मुंबई शहर, इथली माणसे, या अनुषंगाने विषय मांडणारे २० लघुपट यात दाखविले जातात. रविवार, २० ऑक्टोबर रोजी लिबर्टी चित्रपटगृहात ‘डायमेन्शन्स मुंबई’ विभागांतील सर्व लघुपट दाखविण्यात येणार आहेत.
* यंदाच्या महोत्सवातही या २० लघुपटांमध्ये विषयांचे
भरपूर वैविध्य आहे. ‘मुंबई नगरी बडी बांका’ या उक्तीनुसार मुंबईचा वेग, मुंबईकरांची ऊर्जा, इथली वेगवेगळ्या स्तरांतील लोकांची जीवनशैली याचे दर्शन ‘डायमेन्शन्स मुंबई’ या विभागातील लघुपटांतून नेहमीच घडविले जाते.
* ‘मुंबईचा वडापाव’ या लघुपटाचा दिग्दर्शक एम. डी.
महाविद्यालयात शिकणाऱ्या अक्षय सर्जेराव दानवले याने ‘रविवार वृत्तान्त’शी बोलताना सांगितले की, आपल्या सर्वानाच मुंबईचा वडापाव आवडतो. या विषयावर खरेतर माहितीपट बनवायचा होता. परंतु लघुपट हा फॉरमॅट प्रेक्षकांच्या जवळ जाणारा आहे असे वाटले म्हणून लघुपट केला.  मुंबईकरांची ऊर्जा याची चर्चा नेहमीच केली जाते. अनेकांचा सकाळचा नाश्ता वडापाव असतो तर गरीब लोक दिवसभर फक्त वडापाव खाऊनच जगतात. म्हणून माझ्या लघुपटात मी साई रांजणकर हा माणूस वडापावचे मुंबईकरांच्या आयुष्यातील महत्त्व ओळखून अनेक गरजूंना वडापाव वाटत फिरतो असे दाखविले आहे. सहा डी कॅमेऱ्यावर चित्रिकरण करून स्टुडिओमध्ये डबिंग केले आहे. लेखक-दिग्दर्शन मी केले असून प्रथमेश चांदे या माझ्या मित्राने संकलन केले आहे. साई रांजणकर ही यातील प्रमुख व्यक्तिरेखा याच नावाच्या माझ्या मित्रानेच साकारली आहे.  मधल्या वेळेत भूक लागल्यावर वडापाव खाणे हे सर्वच मुंबईकर करतात. परंतु, अनेकांचे पोट फक्त वडापाववरच अवलंबून असते हे या लघुपटातून प्रकर्षांने दाखविले आहे, असेही अक्षयने सांगितले.
* मुंबईत स्थायिक होण्यासाठी येणाऱ्या कॉपरेरेट
क्षेत्रातील एका कुटूंबाचे जगणे, त्यातून निर्माण झालेला तणाव, तरीही ‘अॅडजस्टमेंट’ करणे हा विषय एका लघुपटांतून हाताळला आहे. एक लघुपट १९९२ च्या दंगलीत छायाचित्रे काढणाऱ्या छायाचित्रकारावर आहे. ‘झिरो माईल्स’ नावाच्या लघुपटात मुंबई नेमकी कुठून सुरू होते हा वेगळा विषयही हाताळण्यात आला आहे. ‘शटडाऊन’ नावाच्या एका लघुपटात काही टपोरी मुलं पैसे कमाविण्याचा आगळावेगळा व्यवसाय करतात. लोकल फलाटाला लागण्यापूर्वीच त्यात शिरून आपल्याला हवी ती हवेशीर खिडकीची जागा पटकाविणे हे दिव्य करण्यात सगळे मुंबईकर माहीर असतातच असे नाही. म्हणूनच ही टपोरी मुलं लोकल फलाटाला येऊन थांबण्यापूर्वीच चपळाईने लोकलमध्ये चढून जागा अडवितात आणि प्रवाशांना नंतर ती जागा देऊन त्याचे पैसे घेतात असे ‘शटडाऊन’मध्ये दाखविले आहे,.
* यंदा दिग्दर्शक रवी जाधव, शूजित सरकार, अभिनेता राजकुमार यादव, टिस्का चोप्रा आणि निरंजन अय्यंगार हे परीक्षक म्हणून काम पाहत आहेत.