नक्षलवाद्यांच्या वाढत्या कारवाया पाहता पोलिसांसह सर्व सुरक्षा यंत्रणांनीही उपराजधानीभोवती सुरक्षा आवळली असून विधिमंडळाच्या अधिवेशनात सुमारे आठ हजाराहून अधिक पोलिसांना तैनात करण्यात आले आहेत.
नागपुरात नक्षलवाद्यांनी आतापर्यंत कुठलाही उत्पात केला नसला तरी शहरात पाच वर्षांपूर्वी नक्षलवाद्यांचा शस्त्रांचा कारखाना उघडकीस आला. काही जहाल नक्षलवाद्यांना नागपुरात पकडण्यात आले. दोन वर्षांपूर्वी अधिवेशनाच्या काळातच नक्षलवाद समर्थनाच्या पत्रकांचे गठ्ठे गणेशपेठेत सापडले होते. नक्षलवादी छुप्या रितीने नागपुरात येऊन राहतात, हे उघड आहे. देशातील काही भागात नक्षलवाद्यांचे थैमान पाहता नागपुरातही पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. दहशतवाद्यांपासूनही शहराला सदोदित धोका आहे. नागपुरात संघ मुख्यालय, डॉ. हेडगेवार स्मृती भवन, तसेच दीक्षाभूमी आदी अत्यंत महत्त्वाची स्थळे आहेत.
काही वर्षांपूर्वी संघ मुख्यालयावर चाल करू पाहणाऱ्या पोलिसांच्या गणवेषातील दहशतवाद्यांना सजग पोलिसांनी कंठस्थान घातले होते. तीन ठिकाणी पाईपबॉम्बही सापडले होते. देशात बंदी असलेल्या ‘सिमी’ संघटनेची पाळेमुळे येथे आहेत. काही महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर कारागृहातून ‘सिमी’चे कट्टर कार्यकर्ते पळाले असून त्यांचा ठावठिकाणा अद्यापही लागलेला नाही.
या पाश्र्वभूमीवर विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून नागपुरात सुरू होत आहे. दोन-तीन वर्षांंपूर्वी दहशतवादी वा नक्षलवाद्यांकरवी मिळाली तशी धमकी पत्रे यंदा मिळाली नसली तरी कुठलीच जोखीम न घेण्याचा सुरक्षा यंत्रणाचा प्रयत्न आहे. देशातील सर्व सुरक्षा यंत्रणांनी नागपूर शहरावर लक्ष केंद्रित केले असून सुरक्षेचे पाश आवळले आहेत.
शहराभोवतालची सुरक्षा आवळण्यात आली आहे. पोलीस आयुक्त व सहपोलीस आयुक्तांची धावपळ सुरू असून उपनिरीक्षकांपासून ते वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या वारंवार बैठका घेऊन त्यांना सुरक्षेसंबंधी सूचना दिल्या जात आहेत. ही धावपळ सुरू असतानाही त्यांना सुरक्षेसंदर्भात सतत मुंबई व दिल्लीच्या संपर्कात रहावे लागत आहे. नक्षलवादविरोधी अभियान, तसेच दहशतवादविरोधी पथकही तैनात राहणार आहेत.
नागपूर शहरात, तसेच शहराच्या कानाकोपऱ्यात कानोसा घेतला जात आहे. नागपूर शहरात सुरक्षेचे तिहेरी कवच राहणार आहे. शहरातील लॉज, हॉटेल्स व धर्मशाळांची झडती घेतली जात आहे. ‘फोर्स वन’ची एक तुकडी शहरात दाखल होत असून विधान भवनात, तसेच विधान भवनाभोवती त्यांना तैनात केले जाईल. राज्य राखीव पोलीस दलाच्या विविध कंपन्याही दाखल झाल्या आहेत. बाहेरगावाहून सुमारे चार पोलीस नागपुरात पोहोचले आहेत. त्यांच्यासह शहर व जिल्हा पोलिसांसह आठ हजाराहून अधिक पोलीस बंदोबस्तात राहतील. विधान भवन, रविभवन, नागभवन, मोर्चा पॉइंट, मुख्यमंत्री, मंत्री आणि आमदारांची निवासस्थाने, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी त्यांना तैनात करण्यात आले आहे. विधान भवनात विधिमंडळाची अंतर्गत सुरक्षा आहेच. त्यांच्याशिवाय दोन पोलीस उपायुक्तांच्या नेतृत्वाखाली फोर्सवन, क्युआरटीसह सशस्त्र पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
याशिवाय, गुप्तचरांनाही विधान भवन, त्या भोवतालचा परिसर, शहरातील विविध भागात तैनात करण्यात आले आहे. विधान भवनासह सर्व मंत्र्यांच्या निवासस्थानी प्रवेशपत्रधारकांची बारकाईने तपासणी केल्यानंतरच प्रवेश दिला जाणार आहे. या सर्व ठिकाणी धातूशोधक यंत्रे लावण्यात आली आहे. याशिवाय, सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरांची पाळत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 6th Dec 2013 रोजी प्रकाशित
हिवाळी अधिवेशन काळात उपराजधानीला सुरक्षेचा पाश
नक्षलवाद्यांच्या वाढत्या कारवाया पाहता पोलिसांसह सर्व सुरक्षा यंत्रणांनीही उपराजधानीभोवती सुरक्षा आवळली

First published on: 06-12-2013 at 07:51 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: May naxalist attack in winter session