लाठीमार आणि त्यामुळे झालेली चेंगराचेंगरी या घटनाक्रमानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी लष्करी भरती प्रक्रियेचे नियोजन स्थानिक पोलिसांच्या मदतीने केले गेले असले तरी सहभागी होणाऱ्यांची संख्या कमालीची रोडावली. लष्करी यंत्रणेच्या हेकेखोरपणामुळे आदल्या दिवशी जो अनुभव आला त्यामुळे निराश झालेल्या बहुसंख्य तरूणांनी परतीचा रस्ता धरल्याने या परिसरातील गर्दी ओसरली. हजारो युवक माघारी निघाल्याने नाशिकरोड व देवळाली कॅम्प रेल्वे स्थानक पुन्हा एकदा गर्दीने फुलले.
पाच दिवस चालणाऱ्या या भरती प्रक्रियेत पहिल्या दिवशी नियोजनाचा पूर्णपणे अभाव होता. प्रादेशिक सेनेच्या भरतीसाठी जवळपास १० ते १२ राज्यातील हजारो तरूण देवळाली कॅम्प येथे दाखल झाले होते. प्रत्येक वेळी लष्कर भरतीसाठी प्रचंड संख्येने तरूणांची उपस्थिती राहात असल्याचा अनुभव असतानाही ही सर्व हाताळणी योग्य पध्दतीने करण्यासाठी कोणतेच नियोजन करण्यात आलेले नव्हते. परिणामी, रात्रभर पावसात थांबून सकाळी शारीरिक क्षमता व लेखी परीक्षा देण्यासाठी आशेने आलेल्या तरूणांवर लष्करी जवानांनी लाठीमार केला. यावेळी चेंगराचेंगरी होऊन कित्येक जण जखमी झाले. आपल्याजवळचे साहित्य तसेच टाकून तरूणांना मार वाचविण्यासाठी पळावे लागले. त्यामुळे तरूणांची पादत्राणे व साहित्याचा रस्त्यांवर खच पडला होता. या घटनाक्रमामुळे भयभीत झालेल्या तरूणांनी घरचा रस्ता पकडणे श्रेयस्कर समजले. रेल्वे स्थानकावरही यापेक्षा वेगळी स्थिती नसल्याने स्थानकात रेल्वेखाली सापडून एका तरूणाचा मृत्यू झाला. भरती प्रक्रियेतील या अनागोंदीचा सर्वत्र गवगवा झाल्यानंतर बुधवारी लष्करी भागातील चित्र काहिसे पालटले. मात्र, ज्या तरूणांसाठी हे नियोजन करण्यात आले, त्यांची संख्या बहुतांश प्रमाणात कमी झाली.
टेंपल हिललगतच्या मैदानावर ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. बुधवारी आनंद रस्त्यावरील प्राथमिक शाळेलगत पोलिसांनी अडथळे उभारले. दहा-दहा तरूणांचा गट मैदानाकडे सोडला जात होता. या ठिकाणी पोलिसांनी तरूणांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केल्याचे दिसून आले. आदल्या दिवशी अशी कोणतीही व्यवस्था नव्हती. पोलीस यंत्रणेने गोंधळ होऊ नये याकरिता दुसऱ्या दिवशी दक्षता घेतली असली तरी लष्करी यंत्रणेने तसे औदार्य दाखविले नाही. लष्करी यंत्रणेकडून सहकार्य मिळत नसल्याने परराज्यातील आलेल्या तरूणांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. प्रादेशिक सेनेच्या भरतीत स्थानिकांना प्राधान्य देणे अपेक्षित आहे. परंतु, लष्करी यंत्रणेने तसे न करता अनेक राज्यातील युवकांना बोलाविल्याने ही गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. भरतीस येणाऱ्यांपेक्षा माघारी निघालेल्यांची मोठी संख्या असल्याने नाशिकरोड व देवळाली कॅम्प रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी होती. मुंबईसह देशातील इतर भागात जाणाऱ्या रेल्वेगाड्या या युवकांच्या गर्दीमुळे खच्चून भरत असल्याचे दिसले.