शहरात डेंग्युमुळे मृत झालेल्यांची संख्या वाढत असताना त्यावर नियंत्रण आणण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, त्यांना सेवेतुन बडतर्फ करावे या मागणीकरीता बुधवारी महापालिकेसमोर नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागातर्फे उपोषण करण्यात आले. या संदर्भात पालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
शहर परिसरात मोठय़ा प्रमाणावर कचऱ्यासह घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याबाबत सफाई कर्मचारी कामचुकारपणा करतात. घंटागाडी नियमीत येत नाही. दुसरीकडे आरोग्य विभाग या भागात पाहणी करत नसल्याने सफाई कर्मचाऱ्यांचे फावले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभाराकडे लक्ष वेधण्यासाठी लाक्षणिक उपोषण करण्यात आल्याचे काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष शेख हनिफ बशीर यांनी सांगितले. मुकादम व अधिकारी तसेच सफाई कर्मचारी यांच्यात साटेलोटे असल्याने सफाई कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस नियंत्रणाबाहेर जात आहे. डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणुन औषध फवारणी व धुराळणी केली जाते. हे कामही मनपाने ठेकेदारीने दिल्याने अनेक झोपडपट्टीत धुराळाच काय, औषध फवारणी देखील अनेक महिन्यापासुन झालेली नाही अशी तक्रार आंदोलकांनी केली. त्या ठेकेदारास मनपाचे अधिकारी पाठीशी घालुन आपले हित साधत असुन आपले उखळ पांढरे करून सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणत आहेत. डासांच्या उत्पत्तीमुळे डेंग्युचे प्रस्थ वाढत आहे. आजवर जुन्या नाशिकमध्ये तीनहून अधिक रुग्णांचा बळी गेला. मात्र अद्याप आरोग्य विभागाला जाग आली नाही असा आरोप बशीर यांनी केला आहे. या रूग्णाच्या मृत्यूस आरोग्य विभागाचे अधिकारी जबाबदार असून त्यांना सेवेतुन त्वरीत बडतर्फ करण्याची मागणी त्यांनी केली. आठ दिवसात कारवाई न झाल्यास पक्षाच्यावतीने तीव्र स्वरूपाचे जन आंदोलन छेडण्याचा इशारा बशीर यांनी दिला. यावेळी शहराध्यक्ष शरद आहेर, माजी मंत्री शोभा बच्छाव, सैय्यद रफिक आदी पदाधिकारी उपस्थित होते