महापालिका निवडणूक अवघ्या पाच महिन्यांवर, तर विधानसभा निवडणूक वर्षभरावर येऊन ठेपली असताना येथील विधान परिषदेचे अपक्ष सदस्य मनीष जैन काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मनीष जैन यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास त्यांचे राजकीय गुरू आमदार सुरेश जैन यांच्यासाठी ते फायदेशीर राहील, असे म्हटले जात आहे.
जिल्ह्यात सध्या जामनेर पालिकेची निवडणूक गाजत आहे. आमदारकीची ‘हॅट्ट्रिक’ करणारे भाजपचे प्रदेश सरचिटणीस गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाची परीक्षा काँग्रेस आघाडीकडून पाहिली जात आहे. मागील पंचवार्षिकपासून पालिकेतही महाजन यांची सत्ता आहे. राष्ट्रवादीच्या ईश्वरलाल जैन यांनी या वेळी राष्ट्रवादीसह काँग्रेसच्या सर्व गटातटांना एकत्र आणून महाजन यांच्याशी टक्कर घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पालिका निवडणुकीच्या धामधुमीतच ईश्वरलाल जैन यांच्याकडून त्यांचे पुत्र आ. मनीष जैन यांच्या काँग्रेस प्रवेशासंदर्भात वक्तव्य करण्यात आल्याची चर्चा असून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळ्यासाठी २० एप्रिलचा मुहूर्तही निश्चित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
मनीष जैन हे आ. सुरेश जैन यांच्या सहकार्यामुळेच विधान परिषदेत जाऊ शकले. घरकुल घोटाळ्यामुळे सुरेश जैन वर्षभरापासून न्यायालयीन कोठडीत आहेत. अशा परिस्थितीत पुढील निवडणुकीत सुरेश जैन यांनी उमेदवारी केल्यास त्यांच्यासाठी मार्ग बिकट ठरू शकतो. त्यांची वाट सुकर करण्यासाठीच मनीष जैन काँग्रेसमध्ये प्रवेश करीत असल्याची चर्चा आहे. सुरेश जैन सद्यस्थितीत शिवसेनेचे आमदार असले तरी ते कधीही काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात, अशी चर्चा वर्षभरापासून सुरू आहे. घरकुलसह इतर गैरव्यवहारात गुरफटले गेल्यामुळे सुरेश जैन यांच्या काँग्रेस प्रवेशाला पक्षश्रेष्ठीकडून हिरवा कंदील मिळाला नसल्याचे सांगितले जाते.
महापालिकेसह विधानसभा मतदारसंघही आपल्याच ताब्यात राहावा हा दृष्टिकोन ठेवून सुरेश जैन यांनीच मनीष जैन यांच्या माध्यमातून व्यूहरचना केली असल्याचे काही नेत्यांचे म्हणणे आहे. घरकुलसह इतर घोटाळे पुढे आणण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी केलेले तक्रारदार नगरसेवक नरेंद्र पाटील हे विधानसभेसाठी तयारी करीत असून ते ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते असल्याने त्यांना पक्षाकडून उमेदवारी मिळू शकते. नरेंद्र पाटील यांना रोखण्यासाठीच मनीष जैन यांना पुढे करण्यात येत असल्याचे म्हटले जात आहे. जळगावच्या मरणासन्न अवस्थेतील काँग्रेसला मनीष जैन यांच्या प्रवेशामुळे नवचैतन्य प्राप्त होईल. त्यांच्या माध्यमातून महापालिकेत काँग्रेसचे काही नगरसेवक निवडून येतील, परंतु निष्ठावान काँग्रेसजनांची पक्षात पीछेहाट होईल, अशी भीती एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केली आहे. २००९ मध्ये शिवसेनेच्या सुरेश जैन यांच्या विरोधात काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून सलीम पटेल या नवख्या व्यक्तीस उमेदवारी देण्यात आल्यावर ईश्वरलाल जैनसमर्थक असलेल्या राष्ट्रवादीच्या मनोज चौधरी यांनी बंडखोरी करून सुरेश जैन यांचा विजय निश्चित केला होता, असे आजही म्हटले जाते.
संग्रहित लेख, दिनांक 30th Mar 2013 रोजी प्रकाशित
आ. मनीष जैन काँग्रेसच्या वाटेवर
महापालिका निवडणूक अवघ्या पाच महिन्यांवर, तर विधानसभा निवडणूक वर्षभरावर येऊन ठेपली असताना येथील विधान परिषदेचे अपक्ष सदस्य मनीष जैन काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 30-03-2013 at 01:04 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla manish jain on the way of congress