स्वातंत्र्य दिनाच्या पाश्र्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना नवीन गणवेशांचे वाटप करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने करीत अभिनव आंदोलन छेडल्यामुळे शिक्षण विभागाला जाग येऊन विद्यार्थ्यांना गणवेशांचे वाटप करण्यात आले. मनविसेचे शहर उपाध्यक्ष बबन धोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश देण्याबाबत होत असलेल्या दिरंगाईबाबत आवाज उठविण्यात आला. याप्रश्नी तातडीने निर्णय घेण्याची मागणी शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांच्याकडे करण्यात आली. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या खुर्चीला निवेदन चिकटविण्यात आले होते. या आंदोलनामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांना अडीच महिन्यानंतर का होईना गणवेश मिळाले. विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनापूर्वी गणवेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी मनविसेचे बबन धोंगडे, सरपंच तानाजी गडदे, डॉ.किरण कातोरे, गणपत जगताप, रंगनाथ जाधव, प्रदीप गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.