महापालिकेतील अधिकाऱ्यांवर असलेल्या राजकीय दबावापोटी अनधिकृत फलकांविरोधातील कारवाई थंडबस्त्यात असल्याची माहिती मिळाली. शहरभर मोठय़ा प्रमाणात अनधिकृत फलक लागले असताना केवळ राजकीय दबावापोटी यावर कारवाई करण्यात यंत्रणा उदासीन आहे. त्यामुळे महापालिकेत प्रशासन आहे की नाही, अशी शंका यामुळे निर्माण होते. दरम्यान, शहरातील सर्व अनधिकृत फलके नियमानुसार काढावी अन्यथा, मनसे तीव्र आंदोलन करेल, असा इशारा मनसे नगरसेवक राजेश काळे यांनी दिला.
शहरात अनेक ठिकाणी कार्यक्रमांचे, मेळाव्यांचे, व्यावसायिक स्पर्धकांचे, डॉक्टर, प्रतिष्ठानांचे मोठ मोठाले होर्डिग्ज लावण्यात आले आहे. अनेक अनधिकृत होर्डिग्ज मोठय़ा दिमाखात उभे आहेत. अशा अनधिकृत लोखंडी व लाकडी होर्डिग्जवर महापालिका प्रशासनाची कुठलीही ठोस कारवाई नाही. त्यामुळे केवळ लहान व्यावसायिकांवर कारवाई करायची व बडय़ा नेत्यांच्या होर्डिग्ज व बॅनरला अभय देण्याचा उद्योग महापालिका प्रशासनाने सुरू केला आहे. यामुळे महापालिका प्रशासनाची दुटप्पी भूमिका उघड होत असून याची राज्य शासनाने तात्काळ दखल घ्यावी. अन्यथा, येथील अनधिकृत फलकांच्या प्रकरणी राज्य शासन अडचणीत येण्याची दाट शक्यता विश्वसनीय सूत्रांनी दिली.
राज्यातील इतर महापालिकांमध्ये अनधिकृत होर्डिग्ज नाहीत. पण, अकोल्यात कसे, असा प्रश्न मनसे नगरसेवक राजेश काळे यांनी विचारला आहे. महापालिका आयुक्तांनी तात्काळ शहरातील सर्व अनधिकृत होर्डिग्ज काढण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शहरातील अनधिकृत होर्डिग्ज आयुक्तांनी काढली नाही, तर मनसे सैनिक रस्त्यावर उतरतील, असा इशारा    नगरसेवक  राजेश काळे यांनी दिला. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आयुक्तांवर जबाबदारी निश्चित करावी, असे मत नगरसेवक राजेश काळे यांनी व्यक्त केले.
ज्यांनी अनधिकृत बॅनर लावली आहेत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, यासंबंधी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता तो झाला नाही.