गुन्हा व गुन्हेगारांचा शोध घेणाऱ्या ‘क्राईम पेट्रोल” या टीव्ही मालिकेमधून मुलांच्या हत्येची प्रेरणा मिळाल्याची माहिती सना हिने बल्लारपूर पोलिसांना दिली आहे. दोन वर्षांपूर्वी आपल्यावर दोन युवकांनी अत्याचार केला होता. आता त्यांना सुध्दा अशाच पध्दतीने संपवायचे असल्याचे बयाण हिने पोलिसांना दिल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान सनाच्या बोलण्यात काही अर्थ नाही असे बल्लारपूर पोलिसांचे म्हणणे आहे.
बल्लारपूरातील झाकीर हुसेन वार्डातील शांतीनगर येथील सना अमान खान पठाण हिने दोन दिवसांपूर्वी शफाक व महक या दोन बहीण-भावाची सूडबुध्दीने हत्या केली. अवघ्या १८ वर्षांची सना दिसायला अतिशय सुंदर आहे. त्यामुळे झाकीर हुसेन प्रभागातील अनेक तरुण तिच्यावर फिदा होते. बल्लारपूरात येण्यापूर्वी राजुरा शहरात तिचे वास्तव्य होते. तिथे सोनू खोब्रागडे या युवकाशी तिचे प्रेमसंबंधसुध्दा होते. बल्लारपूर शहरात आल्यानंतर तिने आणखी तीन ते चार मित्र होते. जे तिला रोज भेटायला येत होते. मृतक मुलांच्या आईवडिलांनी आपल्या चारित्र्यावर शिंतोडे उडविले. त्यातच आपल्या आईची मानसिकता खराब झाली आणि तिचा अंत झाला. याचा बदला घेण्यासाठी म्हणून शफाक व महक या बहीण-भावाची हत्याा केली. आणखी संधी मिळाली असती तर तिला सतत चिडवणाऱ्या रोहित, गौतम आणि सैना सय्यद या लहानग्यांचाही खातमा केला असता, असे तिने सांगितले.
तिने त्याच वेळी राजुरा येथील सोनु खोब्रागडे या पूर्वप्रेमीला फोन करून बोलावले. मात्र त्याने येण्यास स्पष्ट नकार दिला. त्याच्या ऑटोने जाऊन वर्धा नदीत आत्महत्या करायचा विचार होता. तो न आल्याने ती बस स्थानकाकडे निघाली असता लागलीच नागरिकांनी तिला चांगलाच चोप देऊन पोलीस ठाण्यात आणले. आता बल्लारपूर पोलिस तिची कसून चौकशी करीत असताना २०११ मध्ये बल्लारपूरातील दोन युवकांनी आळीपाळीने आपल्यावर अत्याचार केला होता, असेही ती सांगत आहे. या दोघांना सुध्दा आपणास ठार करायचे आहे, असे तिने पोलिसांना सांगितले.
याप्रकरणी पोलिसांनी घेतलेल्या बयाणात तिने ‘क्राईम पेट्रोल’ या गुन्हेगारी जगतावर आधारित मालिकेमधून प्रेरणा घेतल्याचे म्हटले आहे. एखाद्या घडलेल्या गुन्हय़ाचे नाटय़रूपांतर या धारावाहिक मधून दाखविण्यात येते. दरम्यान पोलीस तिच्याकडून अधिक माहिती जाणून घेत आहेत.