निसर्ग सौंदर्याची आवड, गिरिशिखरे पादाक्रांत करण्याची महत्त्वाकांक्षा आणि त्यासाठी अथक परिश्रम घेण्याची तयारी या त्रिसूत्रीच्या जोरावर येथील बॉश कारखान्यात कार्यरत असलेल्या आनंद गांगुर्डे या युवकाने हिमालय पर्वतरांगांतील स्टोक कांगरी हे २१ हजार फूट उंचीचे शिखर सर केले आहे. आता त्याला एव्हरेस्ट साद घालत आहे.
शहरातील वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असलेल्या चमूसमवेत आनंद १५ वर्षांपासून गिर्यारोहण मोहिमा नित्यनेमाने पार पाडत आहे. संपूर्ण चमूत आनंद हा एकमेव असा आहे की, ज्याचा वैद्यकीय क्षेत्राशी संबंध नाही. सातपूर औद्योगिक वसाहतीतील बॉश कारखान्यात तो कामगार म्हणून काम करतो. याआधी रूपकंड, कांचनजंगा आदी मोहिमा त्याने यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. स्टोक कांगरी मोहिमेसाठी त्याने साधारणत: १५ वर्षांपासून तयारी केली होती. स्थानिक पातळीवरील गड-किल्ले चढण्याच्या सरावासोबत शारीरिक तंदुरुस्तीसाठी त्याचा सायकलिंग, व्यायाम तसेच पोहण्याचा नियमित सराव सुरू होता. एखादा गड सर केला की, दुपारी कामावर पुन्हा हजर व्हायचे हा त्याचा दिनक्रम. या सरावाचा लाभ त्याला स्टोक मोहिमेत झाल्याचे तो सांगतो. मोहिमेदरम्यान आनंद आणि डॉ. शरद पाटील यांनी कुलू ते खारदुंगला हा ६४० किलोमीटरचा प्रवास सायकलवरून केला. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून १८,३८० फुटांवर आहे. स्टोक कांगरी मोहीम पूर्ण करण्यासाठी तेथील वातावरणाशी एकरूप होणे आवश्यक असते. कांगरी सर करण्यासाठी आणि वातावरणाचा अंदाज घेण्यासाठी दोन ठिकाणी मुक्काम करावा लागतो. त्यात गंडाला पास (१६,८०० फुट), दुसरा स्टोक पास (१७,५००) पार करून दोन दिवस पायथ्याच्या ठिकाणच्या तळावर (१६,८०० फूट) मुक्काम केल्यावर पुढील चढाईकरिता योग्य वातावरण असल्याचे मार्गदर्शकाने सांगितल्यावर रात्री कांगरी मोहिमेतील अंतिम टप्प्याची चढाई सुरू झाली. जसजसे २१ हजार फूट उंचीकडे वाटचाल होऊ लागली, तसतसे हवेतील प्राणवायूचे प्रमाण कमी होण्यास आणि बोचऱ्या व थंड हवेच्या माऱ्यास सुरुवात झाली. या परिस्थितीत मार्गक्रमण करत सकाळी ६.३० वाजता मोहीम पूर्ण झाली. आनंदसोबत असलेल्या सहकाऱ्यांनी या सर्वोच्च क्षणी त्या शिखरावर तिरंगा फडकावला. बॉश कारखान्याच्या आर्थिक पाठिंब्यामुळे आपण या उंचीवर पोहोचू शकलो. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आनंदने कारखान्याचाही झेंडा या शिखरावर फडकावला.आनंदच्या प्रयत्नांची दखल घेऊन कारखान्याने त्याला आधीच अत्याधुनिक अशी ‘माऊंटन बाइक’ सायकल भेट म्हणून दिली आहे. या सायकलवरून जवळपासच्या डोंगरांवर त्याने १०० हून अधिक फेऱ्या मारल्या आहेत. आठवडय़ातून दोन वेळा हरसूल घाट किंवा जव्हार घाट हे ९० ते ११० किमी अंतर पार करणे हा त्याच्या सवयीचा भाग. या सरावामुळे आनंदने सायकलच्या अनेक स्पर्धामध्ये उल्लेखनीय सहभाग नोंदविला. त्यात नाशिक-गोवा सायकलिंग, पुणे येथे एन्डय़ुरो क्रॉस कंट्री स्पर्धेतही त्याने सहभाग नोंदविला. १६० आणि २८० किलोमीटर स्पर्धेत भाग घेऊन त्याने सुवर्णपदक पटकाविले. आनंदला आता एव्हरेस्ट शिखर (२८,९०० फूट) साद घालत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Nov 2013 रोजी प्रकाशित
‘स्टोक कांगरी’वर नाशिकचा ‘आनंदोत्सव’
निसर्ग सौंदर्याची आवड, गिरिशिखरे पादाक्रांत करण्याची महत्त्वाकांक्षा आणि त्यासाठी अथक परिश्रम घेण्याची तयारी या त्रिसूत्रीच्या जोरावर येथील बॉश
First published on: 23-11-2013 at 07:13 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik carnival on stoke kangari