सौर उर्जेसंदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवर जनजागृतीसाठी प्रयत्न करणाऱ्या ‘सोलर एनर्जी’ या मासिकात येथील प्रसाद ठाकूर यांचा ‘सोलर सेल’ विषयावरील शोधनिबंध प्रसिध्द झाला आहे. सौर उर्जेसंदर्भात संशोधन करणाऱ्या जगभरातील संशोधकांमध्ये हे मासिक प्रसिद्ध आहे.
‘सोलर एनर्जी’ हे ‘इंटरनॅशनल सोलर एनर्जी सोसायटी’ चे अधिकृत मासिक असून त्यात जगभरातील महत्वपूर्ण संशोधनाची माहिती व आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त तज्ज्ञांचे लेख प्रसिद्ध होत असतात. या मासिकाची ९६ वी आवृत्ती ऑक्टोबर २०१३ मध्ये प्रसिद्ध होत असून, या आवृत्तीमध्ये या शोधनिबंधाचा समावेश करण्यात आला आहे. या शोधनिबंधामध्ये कमी किंमतीच्या व उच्च कार्यक्षमता असलेल्या ‘सोलर सेल’च्या रचनेविषयी माहिती देण्यात आली आहे.