* दहावीतही मुलींचे वर्चस्व
* २९५ शाळा ‘शंभर नंबरी’
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत नाशिक विभागाचा निकाल ८३.८६ टक्के लागला. या परीक्षेतही पुन्हा मुलींचे वर्चस्व कायम राहिले. उत्तीर्णतेच्या टक्केवारीत विभागात नाशिकने (८९.०२ )आघाडी घेतली असून धुळे जिल्हा (७८.०३) पिछाडीवर पडला आहे. प्रविष्ट झालेल्या १, ८३, ७८६ विद्यार्थ्यांपैकी १, ५४, १२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विभागातील २९५ शाळांचा १०० टक्के निकाल लागला असून ३० टक्क्यांपेक्षा कमी निकालाच्या २५ शाळा आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा विभागाच्या निकालात सुमारे पाच टक्क्यांची वाढ झाली आहे. गुणपत्रिकांचे वाटप १५ जून रोजी शाळांमार्फत केले जाणार आहे.
माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल शुक्रवारी दुपारी एक वाजता जाहीर झाला. शहरी व ग्रामीण भागात इंटरनेट वा भ्रमणध्वनीच्या माध्यमातून निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी व पालक यांची चढाओढ सुरू होती. विभागात उत्तीर्णतेच्या टक्केवारीत नाशिक अग्रस्थानी राहिला. या जिल्ह्याची उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.०२ इतकी आहे. नाशिक जिल्ह्यातील ८१,८९७ पैकी ७२,९०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जळगाव जिल्ह्याची टक्केवारी ८०.५३ राहिली. येथील ५६,६८८ पैकी ४५,६४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ७९.६७ तर धुळे जिल्ह्याचे ७८.०३ टक्के असे आहे. नंदुरबारमधील १८,३२२ पैकी १४,५९७ तर धुळ्यातील २६,८७९ पैकी २०,९७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेच्या प्रमाणात या वर्षीही मुलींचे वर्चस्व राहिले. विभागात ८२,१३५ मुलींनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी ७०,६१० उत्तीर्ण झाल्या. १,०१६५१ पैकी ८३,५१३ मुले उत्तीर्ण होऊ शकले. मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ८५.९७ असून मुलांचे हे प्रमाण ८२.१६ टक्के असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली.
विभागातील एकूण २५ शाळांचा निकाल ३० टक्क्यांपेक्षा कमी लागला. त्यात नाशिक जिल्ह्यातील तीन, धुळे चार, जळगाव तीन व नंदुरबारमधील चार शाळांचा समावेश आहे. महत्वाची बाब म्हणजे, नाशिक, जळगाव व नंदुरबारमधील प्रत्येकी एका शाळेचा निकाल शून्य टक्के लागला. म्हणजे, या शाळेतील एकही विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकला नाही. दुसरीकडे १०० टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या विभागात २९५ इतकी आहे. त्यात नाशिक जिल्ह्यातील १८५, धुळे ३३, जळगाव ४३ व नंदुरबारमधील ३४ शाळांचा समावेश आहे. मागील वर्षी १०० टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या २३१ होती. त्यात यंदा चांगलीच वाढ झाल्याचे निकालावरून लक्षात येते.
ज्या विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी करावयाची आहे, त्यांनी मूळ गुणपत्रिका प्राप्त झाल्यावर २५ जूनपूर्वी मंडळाकडे अर्ज सादर करावयाचा आहे. तसेच ऑक्टोबर २०१३ मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी आवेदनपत्र भरण्यासाठी २५ ते २९ जून हा कालावधी आहे. उत्तरपत्रिकेची छायाप्रत प्राप्त करण्यासाठी विद्यार्थी ७ जून ते २७ जून या कालावधीत अर्ज करू शकतात.
उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनही करता येणार आहे. उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळाल्यापासून पाच दिवसात त्यासाठी अर्ज करावा लागेल, असे मंडळाने म्हटले आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना श्रेणीसुधार योजनेंतर्गत ऑक्टोबर २०१३ व मार्च २०१४ ही संधी उपलब्ध आहे.
नाशिक विभागात २८,६८७ विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्य
दहावीच्या परीक्षेत नाशिक विभागात २८,६८७ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ६५,७७३ इतकी आहे. द्वितीय श्रेणीत ५२,९१७ तर पास श्रेणीत ६७४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष प्राविण्य मिळविण्यात नाशिकने (१५३३५ विद्यार्थी) आघाडी घेतली आहे. धुळे जिल्ह्यातील ३५२१, जळगाव ७९८८, नंदुरबारमधील १८४३ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले.