टोल मागितल्याचा राग आल्याने पिंपळगाव बसवंत येथील नाक्यावर महिला कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणारे शिवसेनेचे अनिल कदम यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि संबंधित महिलांची माफी मागावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शुक्रवारी निफाड तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तसेच राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको करण्यात आला.
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव बसवंत येथील टोल नाक्यावर गुरूवारी हा प्रकार घडला होता. टोल मागितल्याचा राग आल्याने आ. कदम यांनी महिला कर्मचाऱ्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत दमदाटी केली. या घटनेचे पडसाद दुसऱ्या दिवशीही उमटले. आ. कदम यांच्या कार्यशैलीच्या निषेधार्थ माजी आमदार दिलीप बनकर यांच्या नेतृत्वाखाली निफाड तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दुसरीकडे नाशिक शहरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे रास्तारोको करण्यात आला. आंदोलनात महिला अध्यक्ष शोभा मगर, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, छबु नागरे आदी सहभागी झाले होते. कदम यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
निफाड येथे अशोक बनकर पतसंस्थेच्या पटांगणापासून निषेध मोर्चाला सुरूवात झाली. यावेळी आ. कदम यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तहसील कार्यालयावर मोर्चा आल्यावर त्याचे सभेत रूपांतर झाले. यावेळी माजी आमदार बनकर यांनी पिंपळगाव टोलनाका संपूर्ण निफाड तालुक्यासह दिंडोरी तालुक्यातील २० गावातील ग्रामस्थांसाठी टोलमुक्त करण्यात आला आहे.
टोल नाक्यावर आमदार स्वत:ची अडचण सोडवू शकत नाही तो जनतेची काय सोडवणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. टोल नाक्यावर महिलांच्या वस्त्रहरणाची भाषा वापरून आमदाराने तालुक्याचे नाव घालवले आहे. गेल्या चार वर्षांत जनतेला वेठीस धरले, ते आता फार काळ चालणार नाही. जो आमदार महिलांसाठी असे अपशब्द वापरतो, त्याने तालुक्याचे प्रतिनिधीत्व करू नये, असेही बनकर यांनी सुनावले.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवनाथ कडभाने यांनी आ. कदम यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादीतर्फे निषेध केला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पिंगळे यांनी शासनाने महिलांना ५० टक्के आरक्षण दिले, मात्र येथे महिलांचा अपमान केला जातो ही खेदाची बाब असल्याचे नमूद केले. आ. कदम यांनी हप्ते, गैरवर्तन, दादागिरी करून तालुक्याची प्रतिमा डागाळली, असा आरोपही करण्यात आला.
मर्दुमकी महिलांसमोर नाही तर विकासाच्या कामांनी दाखवायची असते. आपल्या कार्यकाळात आ. कदम यांनी एकही काम मंजूर केले नाही. आ. कदम यांच्या कामकाजाची पध्दत पाहता एकही अधिकारी या ठिकाणी काम करायला तयार नसल्याची तक्रार मधुकर शेलार यांनी केली. आजपर्यंत तालुक्यातील एकाही लोकप्रतिनिधीने केले नाही असे असभ्य वर्तन आ. कदम
यांनी केले.
पिंपळगावच्या टोल नाक्यावर महिला कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तन करून तालुक्याचे नाव घालवले. या देशात महिलांना सन्मानाची वागणूक दिली जाते. नारीची पूजा केली जाते. त्यांचा आ. कदम यांनी अपमान केला, अशी तक्रार करत आंदोलकांनी आ. कदम यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.