पनवेल येथील आकुर्ली गावात असणाऱ्या आदिवासी मुलींच्या वसतिगृहात अनेक सुविधा नसल्याने येथील मुलींना मोठय़ा प्रमाणात समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अर्थसंकल्पीय आधिवेशनापूर्वी आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी आलेल्या तक्रारीवरून अचानक आदिवासी मुलांच्या व मुलींच्या वसतिगृहाला भेट देऊन याबाबतची चौकशी केली होती. परंतु त्यांच्या या भेटीचा कोणताही परिणाम अद्याप झालेला नाही, त्यामुळे येथे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येते.
शिक्षणासाठी शहराजवळ सोय नसल्याने अनेक मुली या पनवेलच्या आकुर्ली गावात असणाऱ्या वसतिगृहात दाखल झाल्या. हे वसतिगृह नवीन पनवेल वसाहतीपासून दोन किलोमीटर दूर अंतरावर आहे. या मुली रोज उठून पायी चालत दोन किलोमीटरचा पल्ला पार करत असतात. या मुलींना आजही बोअरवेलचे पाणी प्यावे लागते. या वसतिगृहात पाणीशुद्धीकरण यंत्र आहे, परंतु ते बंद पडले आहे.  ७५ मुलींची क्षमता असलेल्या या वसतिगृहात १२४ मुली राहत असल्याने या वसतिगृहाला कोंडवडय़ाचे रूप आले आहे. १२४ मुलींसाठी सात स्वच्छतागृहे असल्याचे येथील प्रशासक सांगतात. मात्र येथील तुंबलेल्या शौचालयामुळे मुलींच्या आजारी पडण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. जेथे तुंबलेले शौचालय स्वच्छ करायला प्रशासनाला वेळ नाही, पिण्याचे पाणी शुद्ध मिळत नाही अशा परिस्थितीमध्ये या आदिवासी पाडय़ावरून आलेल्या सावित्रीच्या लेकी शिक्षणामध्ये क्रांतीचा मार्ग शोधत आहे.
याबाबत या वसतिगृहाच्या अधिकारी सीमा जोहरे यांनी लवकरच आम्ही वसतिगृह इतर ठिकाणी हलविण्याचा विचार करत असल्याचे सांगितले. मुली आजारी असल्यावर आपणच त्यांना रुग्णालयापर्यंत घेऊन जात असल्याचे जोहरे म्हणाल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neglegence of akurli hostel facilities