शहर परिसरात डेंग्यूचा प्रार्दुभाव वाढत असताना गुरुवारी या आजाराने आणखी एका रुग्णाचा बळी घेतला. एकीकडे महापालिका तसेच आरोग्य विभाग परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा करत असताना दुसरीकडे डेंग्यूचे रुग्ण दगावण्याची स्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णांच्या असहाय्यतेचा फायदा घेत नफेखोरी प्रवृत्ती वाढीस लागली आहे. साध्या प्लेटलेट या ६५० रुपये, लाल रक्त पेशी ११५० रुपये तर प्लाझमा ३०० रुपयाने दिल्या जात आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या आवारात दिवसाकाठी १५ ते २० रक्त पिशव्यांची मागणी होत आहे. शहर परिसरातील विविध रक्तपेढय़ांमध्ये मुबलक साठा असूनही कृत्रिम टंचाई दर्शवत जादा दराने ‘प्लेटलेट्स’ आणि रक्तपिशव्याची विक्री होत आहे. यामुळे डेंग्यूच्या संकटाचा सामना करताना रुग्ण व नातेवाइकांची आर्थिक पिळवून होत आहे.
जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यापासून डेंग्युने डोकेवर काढण्यास सुरुवात केली. वर्षभरात डेंग्युमुळे १८ रुग्ण दगावले असून बुधवारी रात्री चेतनानगर परिसरात राहणारे गुंतवणूक सल्लागार जितेंद्र सुरेश कुलकर्णी (४२) यांचे खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांच्या पत्नीलाही डेंग्यु असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. डासांवर नियंत्रण आणि साठलेल्या पाण्याचे र्निजतुकीकरण करणारे धुरळणी व फवारणी गेल्या काही महिन्यांपासून झाली नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. बळींची संख्या कितीवर जाण्याची प्रतीक्षा महापालिका करत आहे, असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला आहे. याबाबत डेंग्यू अस्वच्छ पाण्यामुळे होत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न होत आहे. पालिका प्रशासन शहर परिसरात पसरलेले घाणीचे साम्राज्य, डबकी, कोंदट वातावरणात किंवा गच्चीवर पडलेले खराब टायर याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करते. महापालिका किंवा आरोग्य विभागात असा आनंदीआनंद असताना रुग्णांच्या असहाय्यतेचा फायदा घेत काही वेळा जिल्हा रुग्णालयात तसेच खासगी रक्तपेढय़ांमध्ये त्यांची डेंग्यू उपचारात आवश्यक असलेल्या ‘प्लेटलेट्स’साठी अडवणूक केली जात आहे.
जिल्हा रुग्णालयात प्लेटलेट्स मुबलक प्रमाणात असल्या तरी काही तांत्रिक कमतरतेमुळे ‘क्रायेप्रेसिपिटेट’ आणि ‘सिंगल डोनर प्लेटलेट्स’ तयार केल्या जात नाहीत. तर साध्या प्लेटलेट या ६५० रुपये, लाल रक्त पेशी ११५० रुपये तर प्लाझमा ३०० रुपयाने दिल्या जात आहे. जिल्हा रुग्णालयाच्या आवारात दिवसाकाठी १५ ते २० रक्त पिशव्यांची मागणी होत आहे. यातील बहुतेक पिशव्या या कोणाच्या तरी ओळखीने, गरोदर माता, दारिद्रयरेषेखालील नागरिकांना नि:शुल्क दिल्या जातात. तर बाहेरील रक्तपेढय़ांकडून १०-१५ रक्त पिशव्या मागितल्या जातात असे जिल्हा रुग्णालयाच्या रक्त विभागाचे प्रसिद्धी प्रमुख शितोळे यांनी सांगितले. खासगी रक्त पेढय़ांमध्ये मात्र प्लेटलेट्स, अन्य रक्त घटकांची किंमत साधारणत ३०० ते १५०० रुपयांनी वाढवूनच विक्री केली जात आहे. कृत्रिम टंचाई तसेच रक्तांचे शुद्धीकरण, आवश्यक चाचण्या आदी कारणांसाठी होणारा खर्च आदी कारणे पुढे करत किंमत वाढविल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
महापालिका व शासकीय रुग्णालयात काही रुग्ण उपचार घेत असले तरी खासगी रुग्णालयातही उपचार घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांची शासकीय यंत्रणेकडे माहिती नसल्याने रुग्णांच्या एकूण संख्येबाबतही संभ्रम आहे. या विषयावर पालिकेत बैठक झाली. त्यावेळी या संकटाचे गांभीर्य लक्षात आले. डेंग्युचे सावट घोंघावू लागल्यावर खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी नफेखोरीकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. रुग्णावर उपचार करताना रक्त व प्लेटलेट्सची नितांत गरज भासते. रुग्णांची संख्या वाढल्याने त्यांच्या मागणीत वाढ होणे स्वाभाविक आहे. तथापि, मुबलक साठा असूनही कृत्रिम टंचाई भासवून त्यांच्या किमती वाढविण्यात आल्या आहेत. यामुळे रुग्ण व नातेवाइकांची आर्थिक पिळवणूक सुरू असल्याची तक्रार केली जात आहे.