सध्या कांद्याचे भाव दिवसेंदिवस गगनाला भिडू लागले आहेत. कांद्याने अनेकांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. वाडय़ातील अनेक गृहिणींवर मात्र कांद्यांच्या वाढलेल्या किमतीचा कोणताही परिणाम झालेला नाही. कारण गेली काही वर्षे पावसाळ्यानंतर कांद्याचे भाव वाढतात, या अनुभवावरून येथील गृहिणी उन्हाळ्यातच घरात पुरेसा कांदा खरेदी करून ठेवतात. उन्हाळ्यात साधारण आठ ते दहा रुपये दराने कांदा किरकोळ बाजारात उपलब्ध असतो. त्याचवेळी ५० ते ६० किलो कांदा खरेदी करून ठेवला जातो. त्यामुळे पावसाळ्यातील भाववाढीचा त्यांच्यावर कोणताही परिणाम होत नाही.
तालुक्यातील कुडूस येथे मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवडय़ात मोठा बाजार भरतो. या बाजारात वाडा, शहापूर, विक्रमगड तसेच भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागातील हजारो कुटुंबीय वर्षभराचा किराणा समान खरेदी करतात. त्यात कांद्याचाही समावेश असतो. पावसाळ्यात असेही कांद्याचे दर चढेच असतात, त्यात यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने कांदा आणखी भाव खाईल, असे भाकीत कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्याने मोठय़ा प्रमाणात कांद्याची खरेदी करण्यात आली. त्याचा परिणाम म्हणून अवघ्या १५ दिवसांत तब्बल चार हजार मेट्रिक टनांहून अधिक कांदा या बाजारात विकला गेला. त्यामुळे या परिसरातील जवळपास प्रत्येक घरी अगदी दिवाळीपर्यंत पुरेल इतका कांदा आहे.  तीन वर्षांपूर्वी डिसेंबर महिन्यात कांद्याचे भाव १०० रुपयांपर्यंत गेले होते. त्यानंतरही दरवर्षी पावसाळ्यात तसेच कांद्याचे नवे पीक येईपर्यंत कांद्याचे दर चढेच असल्याच्या अनुभवानंतर महिला मे महिन्यातच कांदे खरेदी करून ठेवू लागल्या. या साठवणुकीतून सडल्यामुळे चार ते पाच टक्के कांदे वाया जातात, तरीही या सौदा परवडतो, असेही महिलांचे मत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कांदा स्वयंपाकात अत्यंत आवश्यक असला तरी नाशवंत नाही. तो व्यवस्थित ठेवला तर सात-आठ महिने टिकू शकतो. अनेकदा व्यापारी कांद्याच्या या टिकाऊपणाचा वापर आपल्या फायद्यासाठी करतात. मे महिन्यात कांदा आठ ते दहा रुपये किलोने असताना हजारो टन कांदा गोदामात ठेवून पावसाळ्यात भाव चढे असताना दुप्पट-तिप्पट दराने विकतात. साठेबाजीची ही क्लृप्ती आपल्याकडे मध्यमवर्गीय महिला अगदी सुरुवातीपासूनच वापरत आल्या आहेत. त्यासाठी पूर्वी चाळींमध्ये उन्हाळ्यातल्या दुपारी अगदी हटकून वाळवणं आणि साठवणीचा उद्योग सुरू असायचा. उन्हाळ्यातील या उद्योगाने महागाईची झळ फारशी बसत नाही, असा अनेक गृहिणींचा अनुभव आहे. आता चाळ संस्कृती आणि त्याआधारे असणारा शेजार लोप पावू लागल्याने ही पद्धत नाहीशी झाली. आता टॉवर संस्कृतीतील चौकोनी कुटुंबांना वेळ आणि घरात ठेवायला फारशी जागाही नसते. त्यामुळे मिळेल त्या किमतीत निवडलेले धान्य आणि चिरलेली भाजी घेऊन आला दिवस साजरा केला जातो. ग्रामीण भागातील महिलांनी मात्र साधे व्यवहारज्ञान दाखवून कांद्याच्या भाववाढीपासून सुटका करून दाखवली आहे.

मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Onion prices increases saved ones are becomeing helpful