उरणमधील सोन्याचे प्रसिद्ध व्यापारी रमेश पेडणेकर यांनी महाराष्ट्र बँकेकडून घेतलेल्या कर्जापोटी तारण म्हणून ठेवलेले त्यांचे दुकान व घर बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून उरणच्या तहसीलदारांनी कारवाई करून जप्त करीत ते बँकेच्या ताब्यात दिले आहे. मात्र पेडणेकर ज्वेलर्सकडे सोन्याचे दागिने घडविण्यासाठी पैसे व सोने जमा केलेल्या ३५० ग्राहकांना त्यांची देणी देणे बाकी असल्याने पेडणेकरांची मालमत्ता बँकेने ताब्यात घेतल्याने आमचे काय, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. याविरोधात पेडणेकरबाधित संघर्ष समितीने या संदर्भात तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांना आमचीही देणी बाकी असल्याचे पत्र देणार असल्याची माहिती समितीचे सुधाकर पाटील यांनी दिली आहे.

रमेश पेडणेकर यांनी महाराष्ट्र बँकेच्या उरण शाखेतून उरण शहरातील आपले दुकान व राहते घर यांच्या तारणावर ७ कोटी ७६ लाख १४ हजार ६७ रुपये आणि १ कोटी ५५ लाख २ हजार ३९२ रुपये इतकी रक्कम कर्जाऊ घेतली होती. ही रक्कम जमा करावी म्हणून बँकेने तगादा लावला होता. त्याच वेळी रमेश पेडणेकर यांचे दिवाळे निघाल्याने मार्च २०१३ ला त्यांनी दुकान बंद केले होते. या वेळी उरण, पनवेल, मुंबई तसेच अलिबाग परिसरातील ५५० पेक्षा अधिक ग्राहकांनी त्यांच्याकडे सोन्याचे दागिने बनविण्यासाठी सोने तसेच पैसे जमा केलेले होते. ही रक्कम साधारणत: ३ ते ४ कोटी रुपयांची आहे. अचानकपणे दुकान बंद झाल्याने ग्राहकांनाही धक्का बसला. त्याचप्रमाणे वारंवार मागणी करून बँकेची रक्कम जमा केली जात नसल्याने अखेरीस बँकेने जिल्हाधिकारी यांच्याकडे जप्ती काढण्यासाठी अपील केले होते. या अपिलानुसार उरण तहसीलदारांच्या उपस्थितीत मंडळ अधिकाऱ्यांनी जप्तीची कारवाई करीत मालमत्ता महाराष्ट्र बँकेच्या हवाली केली. पेडणेकर यांच्याकडून आपल्या रकमा परत मिळाव्यात यासाठी ग्राहकांनी संघर्ष समिती स्थापन करून दीड वर्षांपासून आंदोलन सुरू केले असून पोलीस ठाण्यात तक्रारदेखील नोंदविली आहे. दरम्यान काही ग्राहकांना त्यांच्या रकमेच्या ७ टक्के रक्कम परत मिळालेली असली तरी अजूनही ३५० ग्राहकांना त्यांची रक्कम येणे बाकी आहे. रमेश पेडणेकर यांच्या मालमत्तेतून आपल्या रकमा मिळतील अशी आशा त्यांना होती. मात्र तीही आता बँकेच्या जप्तीच्या कारवाईमुळे संपुष्टात आली आहे.