मुंबईत यंदा पडलेल्या गुलाबी थंडीची मजा मुंबईकरांनी भरभरून घेतली असली तरी कोकणातील हापूस आंबा बागायतदार आणि मुंबईतील घाऊक व्यापाऱ्यांच्या मनसुब्यांवर मात्र या कडाक्याच्या थंडीने चांगलाच तुडतुडा बरसवला असल्याचे चित्र आहे. बंपर क्रॉप्ट आले म्हणून खुशीत गाजरे खाणाऱ्या बागायतदार, व्यापाऱ्यांना आता एका वेगळ्या चिंतेने त्रासले असून या वर्षी हापूस आंब्याचे पीक तर चांगले येईल, पण कडाक्याच्या थंडीमुळे दुसरी फळधारणा गळून पडली असून त्यानंतर आलेले हापूस आंबे हे आकाराने छोटे आणि त्यांच्यावर तुडतुडा रोगांचे काळे डाग पडले असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांसमोर एक वेगळी समस्या उभी ठाकली आहे.
कोकणातून हापूस आंब्याची आवक आता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. दिवसाला दोन हजार पेटय़ा हापूस आंबा एपीएमसीच्या फळबाजारात डेरेदाखल होऊ लागला आहे. पूर्वी हा आंबा गुढीपाडव्यानंतर विधिवत पूजा करून कोकणातून येत होता, पण आता काळ बदललेला असून नववर्षांरंभीच (एक जानेवारी) हापूस आंब्याचे आगमन फळबाजारात झालेले आहे. नोव्हेंबर महिन्यात झालेली हापूस फळधारणा तग धरत नाही तोच फेब्रुवारी महिन्यात कडाक्याच्या थंडीमुळे गळतीला सुरुवात झाली. त्यामुळे यंदा कोकणातील मोहराने आच्छादलेले झाड बघून बागा खरेदी करणाऱ्या हापूस आंबा व्यापाऱ्यांना आता थंडी भरण्याची वेळ आली आहे. याच काळात हापूस आंब्याच्या झाडांवर तुडतुडा या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे काही व्यापाऱ्यांनी सांगितले. तेव्हापासून व्यापाऱ्यांच्या मनसुब्यावर तुडतुडा फिरल्याचे चित्र आहे. हापूस आंब्याचा व्यापार हा अनेक व्यापाऱ्यांचा कणा आहे. या एकटय़ा फळाच्या जिवावर अनेक व्यापारी वर्षांचा खर्च काढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मोहर बघून यंदा हापूस आंब्याचे खूप पीक येणार असे गणित मांडलेल्या व्यापाऱ्यांना आता छोटे आणि काळंवडलेले फळ हाती पडणार आहे. हापूस आंब्याची आवक कोकणातून जोरात आहे, पण पहिल्या मोहराला गळती लागल्याने तो म्हणावा तसा टिकलेला नाही. त्यानंतर तुडतुडय़ाचे आक्रमण झाले. त्यामुळे फळावर खार पडली असून हापूस आंब्याची या वर्षी दोन भागात वर्गवारी झालेली आहे. त्यात आकाराने लहान आणि तुडतुडय़ामुळे काळा पडलेला आंबा पाहण्यास मिळत असल्याचे हापूस आंबा व्यापारी बाळासाहेब बेंडे यांनी सांगितले. त्यामुळे कोकणातून येणारा हापूस आंबा विकत घेतानादेखील चार वेळा विचार करावा लागणार आहे. या आंब्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असून एक डझनाला सध्या ८०० ते ११०० भाव आहे.