महावितरणचे अधिकारी व गुत्तेदारांच्या संगनमताने जिल्ह्यात मोठा आर्थिक गैरव्यवहार चालू आहे. वीजप्रश्नी आपण वरिष्ठांशी वारंवार चर्चा करूनही दखल घेतली गेली नाही, असा आरोप करीत आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी राष्ट्रवादीकडे असलेल्या ऊर्जा खात्यावर सडकून टीका केली. विजेचे प्रश्न लवकर न सुटल्यास पायातले हातात घेतल्याशिवाय पर्याय राहणार नाही, असेही त्यांनी ठणकावले. ऊर्जा खाते राष्ट्रवादीकडे असल्यामुळे हा मोर्चा त्यांच्याविरोधात आहे, असे कोणी समजत असेल तर आपण त्याची पर्वा करीत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महावितरणचे अधीक्षक अभियंता सुरेश गणेशकर यांच्या मालमत्तेची व भ्रष्ट कारभाराची चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, या मागणीसाठी बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा काँग्रेसतर्फे परभणीत मोर्चा काढण्यात आला. मोर्चा शनिवार बाजार येथून महावितरण, तेथून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. तेथे बोर्डीकर यांनी महावितरणवर चांगलेच तोंडसुख घेतले. मुख्यमंत्री, तसेच ऊर्जामंत्री अजित पवार, महावितरणचे सचिव यांची भेट घेऊन कारभारात सुधारणा करण्यास सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु कारभारात सुधारणा झाली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी भरडला जात असून सत्ताधारी आमदार असतानाही आघाडी सरकारविरोधात मोर्चा काढावा लागत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. रस्त्यावर उतरुन भ्रष्ट अधिकाऱ्याला सरळ करण्याची ताकद बोर्डीकरांमध्ये आहे, असेही सुनावले.
महावितरणवर टीका करतानाच बोर्डीकर यांनी आपला मोर्चा राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या परभणी जि. प.कडे वळविला. जि. प.च्या कारभारावर टीका करतानाच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न व्यवस्थित हाताळला जात नाही, असे सांगून पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या कारभारावरही टीका केली.
वाहनांवर दगडफेक
मोर्चासाठी विशेषत जिंतूर मतदारसंघातील कार्यकत्रे मोठय़ा संख्येने आले होते. मोर्चासाठी आलेल्या वाहनांची पार्किंग ईदगाह मदानावर होती. या वाहनांवर दगडफेक झाल्याने बोर्डीकर संतापले. असा प्रकार झाला असल्यास पोलिसांना माफ केले जाणार नाही, असे सांगून बोर्डीकर यांनी या सर्व वाहनांची नुकसानभरपाई स्वतच्या खिशातून देण्याचे या वेळी जाहीर केले. बोर्डीकर यांनी पोलीस अधीक्षक पाटील यांची भेट घेऊन दगडफेकीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. अधीक्षक पाटील यांनी ‘तक्रार द्या, लगेच कारवाई करतो,’ असे सांगितले.
ईदगाह मदानावर या दगडफेकीमुळे बराच तणाव निर्माण झाला होता. सभेत माजी आमदार कुंडलिक नागरे, लोकसभा युवक अध्यक्षा मेघना बोर्डीकर, हरिभाऊ शेळके, बाबासाहेब फले, शिवाजीराव देशमुख आदींनी संबोधित केले. यावेळी व्यासपीठावर महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष भावना नखाते, आनंद भरोसे, भगवान वाघमारे, डॉ. विवेक नावंदर, चंद्रकांत राठोड, नगराध्यक्ष सचिन गोरे, हेमंत आडळकर, इरफान नुर रहेमान, नामदेव डख, बंडू पाचिलग आदी उपस्थित होते.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनुपस्थित
महावितरणविरोधात मोर्चा काढण्यासंबंधी आठ दिवसांपूर्वी घेतलेल्या बठकीस काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख उपस्थित होते. मोर्चा जिल्हा काँग्रेसच्या वतीने काढण्यात आला. परंतु मोर्चाला जिल्हाध्यक्ष देशमुख यांची अनुपस्थिती चच्रेचा विषय ठरली.
संग्रहित लेख, दिनांक 17th Jan 2014 रोजी प्रकाशित
महावितरणविरुद्ध मोर्चा, वाहनांवर दगडफेकीने तणाव
महावितरणचे अधिकारी व गुत्तेदारांच्या संगनमताने जिल्ह्यात मोठा आर्थिक गैरव्यवहार चालू आहे. वीजप्रश्नी आपण वरिष्ठांशी वारंवार चर्चा करूनही दखल घेतली गेली नाही, असा आरोप करीत आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी राष्ट्रवादीकडे असलेल्या ऊर्जा खात्यावर सडकून टीका केली.

First published on: 17-01-2014 at 01:55 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rally on mahavitaran against economic malpractice mla ramprasad bordikar