तुंबलेल्या गटार दुरुस्तीच्या कामाला कमालीचा विलंब होत असल्याने संतापलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या दत्त चौकातील मंडळ कार्यालयात घुसून तोडफोड करीत ‘राडा’ केला. बुधवारी सकाळी हा प्रकार घडला असून याबाबत फौजदार चावडी पोलीस ठाण्यात १५ कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
पुणे रस्त्यावरील मडकी वस्ती परिसरात सार्वजनिक गटार तुंबल्याने त्याकडे पालिका मंडळ कार्यालयाचे लक्ष वेधण्यात आले होते. परंतु वारंवार सांगूनदेखील तुंबलेली गटार दुरुस्त केली जात नसल्यामुळे नजीकच्या बाळे परिसरातील मनसे कार्यकर्त्यांचा तोल सुटला. अमोल झाडके व त्यांच्या इतर सहकारी कार्यकर्त्यांनी या प्रश्नावर संतप्त होत पालिकेच्या दत्त चौकातील मंडळ कार्यालयावर धडक मारली.
कार्यालयात घुसल्यानंतर या कार्यकर्त्यांनी अरेरावी करीत तेथील अधिकारी व कर्मचा-यांना धारेवर धरले. गटार दुरूस्तीचे काम सकाळीच हाती घेण्यासाठी कर्मचा-यांना जेसीबी यंत्रासह पाठविण्यात आल्याचे उत्तर तेथील अधिका-यांनी दिल्यानंतर कार्यकर्त्यांचा संताप कमी न होता उलट त्यांच्याकडून कार्यालयात ‘राडा’ झाला. कार्यालयातील मंडळ अधिकाऱ्याचे टेबल उचलून फेकण्यात आले व इतर सामानाची तोडफोड करण्यात आली. खिडकीची तावदानेही फोडली गेली. खुच्र्याही फेकण्यात आल्या. दरम्यान, दहा मिनिटे हा राडा सुरू असताना पालिका सहायक आयुक्त डॉ.पंकज जावळे व पोलीस तेथे धावून आले. पालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार हेदेखील थोडय़ाच वेळात दाखल झाले. मंडळ अधिकारी राजकुमार रेड्डी यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात या घटनेप्रकरणी मनसे कार्यकर्त्यांविरूध्द फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी यासंदर्भात कोणालाही अटक केली नाही.
संग्रहित लेख, दिनांक 6th Feb 2014 रोजी प्रकाशित
तुंबलेल्या गटार दुरुस्तीवरून पालिका मंडळ कार्यालयात ‘राडा’
तुंबलेल्या गटार दुरुस्तीच्या कामाला कमालीचा विलंब होत असल्याने संतापलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या दत्त चौकातील मंडळ कार्यालयात घुसून तोडफोड करीत ‘राडा’ केला.

First published on: 06-02-2014 at 03:45 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Razzle of mns in municipal board office over drainage repairing