शिक्षणामुळे वाढत असलेला आत्मविश्वास आणि तंत्रज्ञानामुळे होत असलेली जगाची ओळख यामुळे तरुणी आपल्या हक्कांविषयी अधिक जागरूक होत आहेत. पण तरुणांवरील जुन्या रूढींच्या प्रभावामुळे-पौरुषात्वाच्या पारंपरिक कल्पनांमुळे आधुनिक जगातील तरुणांची घुसमट होत आहे. ती व्यक्त कशी करावी हे त्यांना समजत नाही व त्यातूनच तरुण मुले ही मुलींबाबत असंवेदनशील होत आहेत. त्यामुळेच मुलींबाबत तरुणांमध्ये संवेदनशीलता वाढवण्याची गरज ‘मेन अगेन्स्ट व्हायोलन्स अ‍ॅण्ड अ‍ॅब्युज’सारख्या (मावा) संघटनानां वाटत आहे. त्यामुळे दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणाला एक वर्ष होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या माध्यमातून १६ डिसेंबर रोजी शहरभर ‘राइज’ हे जनजागृती अभियानाची आखणी करण्यात आली आहे.
गेली वीस वर्षे ‘मावा’ संस्था (मेन अगेन्स्ट व्हायोलन्स अ‍ॅण्ड अ‍ॅब्युज) स्त्रियांच्या समस्यांबाबत पुरुषांमध्ये संवेदनशीलताजागृत करण्यासाठी कार्यरत आहे. या काळात स्त्रियांच्या शोषणाचे वेगवेगळे मुद्दे समोर येत गेले. दोन वर्षांपूर्वी स्त्रीभ्रूणहत्येचा विषय ऐरणीवर होता. गेल्या वर्षी दिल्ली येथील बलात्काराने देशाला हादरवले तर आता कार्यालयातील लैंगिक शोषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या सगळ्यांविषयी स्त्रियांना व पुरुषांनाही बोलते करण्यासाठी व आवाज उठवण्यास मदत करण्यासाठी हे अभियान राबवण्यात येत असल्याचे ‘मावा’चे संस्थापक हरिष सदानी यांनी सांगितले.
या अभियानाअंतर्गत शहरातील विविध भागात ३५ महाविद्यालयांमधील सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांमार्फत जागृती करण्यात येणार आहे. सीएसटी, चर्चगेट रेल्वे स्थानक, फोर्ट परिसरापासून पश्चिम उपनगरे, पूर्व उपनगरे तसेच ठाणे शहरातही विद्यार्थी याबाबत बोलणार आहेत. फलक, घोषवाक्य, पथनाटय़ तसेच थेट संवादातून स्त्रियांसंबंधीच्या प्रश्नांबाबत जागृती केली जाईल तसेच शंकांना उत्तरे दिली जातील. याच दिवशी संध्याकाळी सहा ते आठ या वेळेत दादर येथील कीर्ती महाविद्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून निवृत्त न्यायमूर्ती आनंद पोतदार, पोलिस सहआयुक्त सदानंद दाते, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरिश शेट्टी, राज्य अल्पसंख्याक विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. टी. ठकेकरा उपस्थित राहणार आहेत.