खासदार आनंद परांजपे यांच्या पत्नी सोनल यांची गाडीत ठेवलेली पिशवी चोरटय़ांनी पळवून नेल्याची घटना गुरुवारी काटई येथे घडली. पिशवीत तीन लाख रुपये रोख, वेगवेगळ्या बँकांची एटीएम कार्डे, संसदेतील प्रवेशाचा व्हीआयपी पास असा ऐवज होता. काटई टोलनाक्याजवळील पेट्रोल पंपाजवळ गुरुवारी ही घटना घडली. सोनल परांजपे घाटकोपर येथून इनोव्हा गाडीतून डोंबिवलीत येत होत्या. काटईजवळ गाडीत पेट्रोल भरण्यासाठी त्या खाली उतरल्या. त्या वेळी चोरटय़ांनी गाडीत असलेली त्यांची पर्स तसेच पिशवी उचलून पोबारा केला. मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार करण्यात आली आहे.