देवळाली कॅम्प येथे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी मार्गदर्शन केले.
प्रस्थापित नेत्यांच्या चुकीच्या राजकारणामुळे रिपब्लिकन चळवळीची धार बोथट झाली असून शासन व प्रशासनावर रिपब्लिकन चळवळीचा वचक राहिलेला नाही. चळवळीला नवीन ऊर्जा प्राप्त करून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे, असे आवाहन कटारे यांनी केले. संपूर्ण महाराष्ट्रात प्रस्थापित समाज व्यवस्थेने ज्या घटकांना त्यांच्या हक्क व अधिकारापासून अजूनही वंचित ठेवले आहे, अशा सर्व घटकांना सोबत घेऊन राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने महाराष्ट्रात एक नवीन आघाडी उभी करण्याचा प्रयत्न करीत आहोत, असेही कटारे यांनी नमूद केले. या देशातील गरिबांच्या हाती सत्तेची सूत्रे येत नाही तोपर्यंत त्यांची प्रगती होणे शक्य नाही. हे हेरून राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने सर्व जाती धर्माच्या घटकांना आपल्या सोबत घेतले असल्याचे त्यांनी सांगितले.
देवळाली छावणी परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भातही मेळाव्यात उमेदवारांची चाचपणी करण्यात आली. तीन वॉर्डात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला. मेळाव्याचे आयोजन शहर जिल्हा सरचिटणीस संतोष तांबे यांनी केले होते.