डॉ. वसुंधरा पेंडसे-नाईक यांचे आवाहन
मराठी भाषा संवर्धनाचे कार्य केवळ सरकारचे नसून भाषा संवर्धनासाठी साहित्य संस्थांनी प्रयत्न करण्याचे गरज आहे. मायबोलीची सेवा करणे, तिच्यावर प्रेम करणे हे आपले कर्तव्यच आहे, असे प्रतिपादन मुंबई मराठी साहित्य संघाच्या माधव ज्युलियन पुरस्कार विजेत्या साहित्यिका डॉ. वसुंधरा पेंडसे-नाईक यांनी बदलापूरमध्ये केले.
मुंबई मराठी साहित्य संघ व निसर्ग ट्रस्ट संचालित ग्रंथसखा वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने ३९ वे महानगर मराठी साहित्य संमेलन बदलापूर येथील पाटील मंगल कार्यालयात साकारण्यात आलेल्या कै. नानासाहेब चाफेकर साहित्यनगरीत पार पडले. या वेळी डॉ. वसुंधरा पेंडसे-नाईक यांना माधव ज्युलियन पुरस्कार संमेलनाच्या अध्यक्षा ज्येष्ठ साहित्यिका मंगला गोडबोले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला तर नारायण काणे पुरस्कार अभिनेता चिन्मय मांडलेकर यांना देण्यात आला. य्
ाा वेळी पत्रकार डॉ. उदय निरगुडकर, मुंबई मराठी साहित्य संघाच्या कार्याध्यक्षा उषा तांबे, कार्यवाह उज्ज्वला मेहेंदळे, स्वागताध्यक्ष श्रीधर पाटील, ग्रंथसखा वाचनालयाचे संचालक श्याम जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. साहित्य संमेलनांची गरज समाजाला असून बदलापुरात अखिल भारतीय साहित्य संमेलनाही व्हावे, अशी अपेक्षा संमेलनाच्या अध्यक्षा मंगला गोडबोले यांनी व्यक्त केली. त्यांनी आजवर लिहिल्या गेलेल्या साहित्याचा आढावा आपल्या भाषणात घेतला व कसदार साहित्याची महाराष्ट्राला गरज असल्याची भावना व्यक्त केली.
डॉ. वसुधा पेंडसे-नाईक यांनी सन्मानाला उत्तर देताना मराठी भाषा अशक्त होत आहे. ती सशक्त होण्यासाठी केवळ तिच्यावर प्रेम करून भागणार नाही तर ती ज्ञानभाषा होण्यासाठी प्रयत्न सुरू केले पाहिजेत. मराठी ज्ञानभाषा असेल तर नवी पिढी या भाषेकडे आकर्षित होईल. त्यासाठी सरकार इतकेच साहित्य संस्थांनीही मेहनत घेऊन अन्य भाषेतील शब्दांचे दर्जेदार अनुवाद देण्याची गरज आहे, असे मत व्यक्त केले. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sahitya organization should try for language enhancement