कल्याणच्या विक्रीकर कार्यालयातील लाचखोर विक्रीकर उपायुक्त रमेश जैद याच्याकडे कोटय़वधी रुपयांची मालमत्ता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना आढळून आली आहे. ही मालमत्ता जैद याची पत्नी, नातेवाईक यांच्या नावे असल्याचे आढळून आले आहे. रमेश जैद व त्याचा साथीदार आर्चिस वसारिया यांना कल्याण न्यायालयाने सोमवापर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
रमेश जैद याची पत्नी, मुलगी, मेहुणा, भाऊ यांच्या नावाने दादर, खारघर, डोंबिवली आणि पुणे येथे पाच सदनिका आढळल्या आहेत. पत्नी व पुतण्याच्या नावाने खारघर, बदलापूर, पुणे येथे चार दुकाने, सॉफ्टवेअर्स कॉम्प्युटर एज्युकेशन नावाने पत्नीच्या नावाने भागीदारी फर्म, गुरुकृपा डेव्हलपर्स या भागीदारी फर्ममध्ये पत्नी व नातेवाइकांच्या नावाने एक कोटी ४० लाख ६० हजारांची गुंतवणूक, विविध बँकांमध्ये दीड लाख रुपयांची रोख रक्कम, एक होन्डा सिटी तसेच एक अ‍ॅक्टिव्हा गाडी आढळून आली आहे. ही माया रमेश जैदने कोणत्या मार्गाने जमा केली आहे, याचा शोध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून घेतला जात आहे.
डोंबिवली जिमखाना येथे एका खासगी साहाय्यकामार्फत पाच लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे पथकाने विक्रीकर उपायुक्त रमेश जैद याला बुधवारी अटक केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रमेश व आर्चिसला गुरुवारी सुट्टीकालीन न्यायालयासमोर हजर केले.
या वेळी सरकारी वकील दीपक तरे यांनी जैद यांच्या मालमत्तेची चौकशी बाकी असल्याने त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. ते मान्य करीत न्यायालयाने रमेश व आर्चिस यांना सोमवापर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 

मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sales tax officer ramesh jaid in custody