पालिकेतर्फे प्रतिबंधक मोहीम
शहरात आतापर्यंत डेंग्युचे सात रुग्ण आढळले असून मलेरिया विभागामार्फत प्रतिबंधक मोहीम सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी केले आहे.
सप्टेंबरअखेर शहरात १९ डेंग्युच्या संशयित रुग्णांचे रक्ताचे नमुने नाशिक येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील फक्त एकालाच डेंग्युची लागण झाल्याचे आढळले. तर ऑक्टोबरमध्ये २२ नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले असता त्यातील सहा रुग्णांना डेंग्यु झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्याची माहिती नगराध्यक्षांनी दिली आहे. डेंग्युचा फैलाव रोखण्यासाठी पालिकेच्या मलेरिया विभागामार्फत सध्या डास प्रतिबंधक विशेष मोहीम राबविली जात आहे. डासअळी नाशकांची फवारणी करणे, घरोघरी जावून पाणीसाठय़ाची तपासणी करणे, दुषित आढळलेल्या तसेच स्वच्छ पाण्यात डास आढलले असता तेथे जंतुनाशके टाकणे तसेच त्याठिकाणी गप्पी मासे सोडणे, नदीपत्रातील डबकी तसेच इतर ठिकाणी साठलेल्या डबक्यांमध्ये ऑईल व जंतुनाशके टाकणे आदी प्रतिबंधात्मक उपाय करण्यात येत आहेत.
आरोग्य सेवकांमार्फत घरोघरी मलेरिया व इतर तापसदृश्य रुग्णांची पाहणी करण्यात येत आहे. मलेरिया व डेंग्यु संशयित रुग्णांचे रक्ताचे नमूने तपासणीसाठी घेतले जात आहेत. याबाबत नगरपालिकेने विविध भागांसाटी कर्मचाऱ्यांची पथके नेमली आहेत. तसेच आरोग्य पर्यवेक्षक प्रकाश दखने, आरोग्य सहाय्यक डी. ए. चव्हाण ९८६०४३६६३२, आरोग्यसेवक एस. आर. ठाकरे ९४२१५०५३४८ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरून जावू नये तसेच आपल्या घरांतील व परिसरातील पाणीसाठे आठवडय़ातून एकदा स्वच्छ करून घ्यावेत. सर्व पाणीसाठे झाकून ठेवावेत. ज्यामुळे डास अशा गढूळ व चांगल्या पाण्यावर अंडी घालणार नाहीत. भंगार, निरुपयोगी सामनांची विल्हेवाट लावावी, कायमस्वरुपी पाणीसाठय़ाच्या ठिकाणी गप्पी मासे सोडावेत, डासांचा उपद्रव टाळण्याकामी घर व परिसरात स्वच्छता ठेवावी, आरोग्य कर्मचारी घरी तपासणीसाठी आले असता त्यांना पाणीसाठे दाखवून अळीनाशक औषध टाकण्यासाठी अडचणी आणू नये असे आवाहन शहरातील नागरिकांना नगरपरिषदेतर्फे करण्यात आले आहे.