मुंबई येथील कर्मवीर भाऊसाहेब हिरे प्रतिष्ठानच्या वतीने सहा व सात सप्टेंबर रोजी येथील परशुराम साईखेडकर नाटय़गृहात ‘राज्यस्तरीय शिक्षण साहित्य संमेलन २०१३’ आयोजित करण्यात आले असल्याची माहिती नाशिक विभागाचे शिक्षक आमदार तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष आ. डॉ. अपूर्व हिरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ असून विधानसभेचे उपाध्यक्ष वसंत पुरके उद्घाटक आहेत. कर्मवीर भाऊसाहेब हिरे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष प्रशांत हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली संमेलन होत असल्याचे आ. हिरे यांनी सांगितले. सहा सप्टेंबर रोजी सकाळी नऊ ते दहा दरम्यान कुसुमाग्रजांच्या निवासस्थानापासून ते संमेलन स्थळापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात येणार असून यावेळी महापौर अ‍ॅड. यतिन वाघ उपस्थित राहणार आहेत. सकाळी १० वाजता मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सभापती अ‍ॅड. नितीन ठाकरे यांच्या उपस्थितीत खा. प्रतापदादा सोनवणे यांच्याहस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. ११ वाजता पुरके यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. दुपारी दोन ते चार दरम्यान ‘महाराष्ट्रातील शिक्षणाची दिशा व दशा’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री सुरेश नवले हे राहणार आहेत. या परिसंवादात रामनाथ मोते, भगवान साळुंखे, ना. गो गाणार, वसंत खोटरे, कपिल पाटील, विक्रम काळे आदी आमदार सहभागी होणार आहेत. सायंकाळी चार ते सहा दरम्यान कवी संमेलन होणार असून जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे हे अध्यक्षपदी असतील. सायंकाळी सात ते रात्री नऊ दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रम पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू यांच्या अध्यक्षतेखाली होईल.
दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ ते ११ या कालावधीत कथाकथन होणार आहे. प्रा. वेदश्री थिगळे हे अध्यक्षस्थानी असतील. त्यानंतर ११ ते १२.३० दरम्यान ‘आधुनिक भारताच्या निर्मितीत शिक्षकांचे योगदान’ विषयावर डॉ. मो. स. गोसावी यांचे व्याख्यान होईल. दुपारी दीड ते साडेतीन दरम्यान ‘मराठी साहित्य शिक्षकांचे योगदान’ या विषयावर माहाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होईल. भालचंद्र शिंदे, डॉ. राम कुलकर्णी, वासुदेव मुलाटे, डॉ. स्नेहल तावरे हे सहभागी होत असून प्रा. डॉ. कमल आहेर परिसंवादाच्या निवेदिका आहेत. अधिवेशनाचा समारोप दुपारी साडेतीन वाजता होणार असून याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरूण जामकर, प्रशांत हिरे, संमेलनाध्यक्ष विठ्ठल वाघ, आ. डॉ. अपूर्व हिरे उपस्थित राहणार आहेत. अधिक माहितीसाटी ०२५३ – २५७३१२७ या क्रमांकावर संपर्क साधावा.