भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या विद्यमाने एनसीएसटीसी नेटवर्क, नवी दिल्लीच्या वतीने दरवर्षी राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचे आयोजन केले जाते. यंदा २२ वी राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद २७ ते ३१ डिसेंबर दरम्यान बंगळुरू येथे होणार आहे. या उपक्रमाचे जिल्हा व राज्यस्तरीय आयोजन जिज्ञासा ट्रस्ट, ठाणेच्या वतीने करण्यात येते. राज्यस्तरीय विज्ञान परिषद २९ ते ३० नोव्हेंबर दरम्यान बियानी मिलटरी स्कूल, भुसावळ येथे होणार आहे. पुणे येथे पार पडलेल्या विभागीय परिषदेत राज्यभरातून एकूण १८४  प्रकल्प सादर करण्यात आले होते. त्यातून ५४ प्रकल्प राज्यस्तरीय परिषदेसाठी निवडले गेले आहेत. ठाणे आणि नवी मुंबईतील दहा प्रकल्पांचा त्यात समावेश आहे.
२२ वी राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात होणार आहे. यावर्षीच्या परिषदेचा मुख्य विषय ‘जाणून घेऊ या हवा आणि हवामान’ हा आहे तर उपविषयांमध्ये आपल्या सभोवतालची हवा, मानवी कृतीचा हवामानावर होणारा परिणाम, हवामान आणि परिसंस्था, हवामान, समाज आणि संस्कृती, शेती आणि हवामान, हवामान आणि आरोग्य याचा समावेश आहे. राष्ट्रीय परिषदेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रयोगांची तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय राज्यपूर्व आणि राज्यस्तरीय अशा चार परिषदांमधून निवड केली जाते. यंदा ठाणे शहरातून तालुकास्तरावर २०३ प्रकल्प सादर करण्यात आले होते. त्यातील ६३ प्रकल्पांची निवड जिल्हास्तरीय परिषदेसाठी करण्यात आली होती. त्यामधील १३ प्रकल्प पुणे येथील राज्य पूर्व परिषदेसाठी निवडण्यात आले होते. त्यातील दहा प्रकल्प आता राज्य परिषदेत सादर होणार आहेत. श्रीरंग विद्यालयाचे चार, बेडेकर विद्यालय, राबोडी येथील सरस्वती शाळा, लोकपुरम आणि भगवती हायस्कूलचे प्रत्येकी एक तर नवी मुंबईतील आर.एस.नाईक व इरो किडस् शाळेच्या एकेक प्रकल्पाचा त्यात समावेश आहे.