भारतीय सैन्यातून मेजर पदावरून निवृत्त झालेल्या एका लष्करी अधिकाऱ्याच्या दोन चारचाकी वाहनांची बुधवारी रात्री काही अनोळखी व्यक्तींनी मोडतोड केली आहे. पांडुरंगवाडीतील अनुजा इमारतीसमोर हा प्रकार घडला आहे.
मेजर विनय देगावकर यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये एक नगरसेवक व गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांवर देगावकर यांनी संशय व्यक्त केला आहे. देगावकर यांनी सांगितले, गेले महिनाभर आपण आपल्या इमारतीसमोर गणेशोत्सव साजरा होऊ नये म्हणून पोलीस आणि पालिका प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न करीत होतो. या गणेशोत्सवात वाजविण्यात येणाऱ्या साधनांमुळे परिसरात शांततेचा भंग होतो. या भागातील नागरिकांनीही या उत्सवाविषयी नाराजी व्यक्त केली होती. पोलीस ठाण्यात याप्रकरणी अर्जही दिला होता. मात्र पोलीस तसेच महापालिकेने परवानगी दिल्याने हा उत्सव साजरा झाला. आपल्या विरोधाला लक्ष्य करण्यासाठी गाडय़ांची मोडतोड केली असण्याची शक्यता देगावकर यांनी व्यक्त केली आहे. दोन्ही वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The vehicle debris of retired major