टीएमटीच्या जादा फेऱ्या ’ मनसे कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक नोटिसा
राज्यातील टोलनाक्यांविरोधात बुधवारी मनसे रास्ता रोको आंदोलन करणार असल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होण्याची तसेच पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलन चिघळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पाश्र्वभूमीवर ठाणे परिवहन सेवेने प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून काळजी घेण्याचे तसेच शहरात परिवहनच्या बसफेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात ठाणे परिवहन सेवेच्या अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन त्यात महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या आंदोलनामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी ठाणे शहर आणि ग्रामीण पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. याशिवाय आंदोलनात सक्रिय असणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक नोटिसा धाडण्याचे आणि काहींना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पुणे येथे रविवारी झालेल्या सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोलनाक्यांविरोधात बुधवारी राज्यभर रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले होते. या आंदोलनाचे नेतृत्व करणार असल्याचे स्पष्ट केले होते. तेव्हापासूनच मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाच्या नियोजनाची तयारी सुरू केली आहे. राज्यातील टोलनाक्यांवर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्यामुळे मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची दाट शक्यता आहे. ठाणे जिल्ह्य़ात सर्वाधिक टोल नाके असून तेथून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. तसेच मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वर्सोवा पुलाचे काम सुरू असल्यामुळे येथील मोठी वाहने कापुरबावडी येथून भिवंडी मार्गे वळविण्यात आली आहे. शहरातील आनंदनगर, मॉडेला चेकनाका, खारेगाव, कशेळी, मुंब्रा, कटई, तळोजा या टोलनाक्यांवर आंदोलन झाले तर शहरासह जिल्ह्य़ातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी होऊ शकते. त्यामुळे शहरातील टोलनाक्यांवर बंदोबस्तात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच रास्तो रोको आंदोलनामुळे वाहतूक कोंडी झाली तर ती कशा प्रकारे सोडवायची, याचाही विचार केला जात असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.