जायकवाडी जलाशयात ३३ टक्क्य़ांपर्यंत पाणी नसेल, तर टक्केवारीत तेवढाच आकडा गाठता यावा, एवढेच पाणी नगर व नाशिक जिल्ह्य़ांतून सोडण्याच्या हालचाली जलसंपदा विभागात सुरू झाल्या आहेत. टंचाईची व्याख्या धरण ३३ टक्के भरण्यापर्यंत असल्याने कायद्यातील तेवढय़ाच मुद्दय़ाला पुढे करून ‘समन्यायी’ पाणीवाटपाला वळण दिले जात आहे. सध्या जायकवाडीत ३० टक्के पाणीसाठा आहे.
अधिकचे पाणी मिळवायचे असेल तर धरणातील १४ टक्के गाळ वजा करून तेवढे पाणी द्यावे, अशी मागणीही जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी मंत्र्यांपुढे रेटली. मात्र, त्यांना यश आले नाही. दोन दिवसांपूर्वीच या प्रश्नी मंत्रालयात बैठक झाली. जलसंपदा मंत्र्यांसह बहुतांश नेतेमंडळी टंचाईच्या व्याख्येभोवतीच गुरफटली असल्याने या वर्षीही जायकवाडीच्या लाभक्षेत्रात पाण्याचे आवर्तन होण्याची शक्यता धूसर झाली आहे.
जायकवाडी जलाशयात वरील धरणांतून पाणी सोडावे, या मागणीसाठी मराठवाडय़ात बरीच आंदोलने झाली. मात्र, या आंदोलनात सहभागी असणाऱ्यांची संख्या तशी कमीच होती. तुलनेने नगर जिल्ह्य़ातून न्यायालयीन लढय़ासाठी उभे करण्यात आलेले वकील व आंदोलनातील संख्या मोठी होती. मात्र, जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायद्यातील तरतूद मराठवाडय़ाच्या बाजूच्या असल्याचा दावा केला जातो. समन्यायी पाणीवाटपाऐवजी टंचाईची व्याख्या पुढे करून आता जायकवाडीत ३३ टक्के पाणी हवे असेल तर तेवढेच पाणी वरून सोडू, अशा भूमिकेवर काही नेतेमंडळी आली आहेत. मुंबईच्या बैठकीतही या अनुषंगाने चर्चा झाली. कोणत्या तरतुदीच्या आधारे जायकवाडीत अधिक पाणी मागायचे, या विषयी प्रशासन संभ्रमात आहे. मात्र, समन्यायी पाणीवाटपाचा आग्रह धरून मागणी नोंदविली गेल्यास एखाद्या आवर्तनापुरते पाणी मिळावे, अशी मागणी करता येणे शक्य असल्याचे जलसंपदा विभागातील काही अधिकारी सांगतात.
३३ टक्क्य़ांचा निकष पाळला गेला तर त्यातून गाळाची टक्केवारी वगळावी, अशीही मागणी प्रशासकीय पातळीवर केली जात आहे. मात्र, या मागण्यांना राजकीय नेत्यांकडून पाठबळ मिळत नसल्याचे चित्र आहे. अपक्ष आमदार प्रशांत बंब व राष्ट्रवादीचे आमदार अमरसिंह पंडित यांनी १६ ऑक्टोबरपासून उपोषणाचा इशारा दिला आहे. मात्र, ३३ टक्के हा टंचाईचा निकष गृहीत न धरता किमान एका आवर्तनासाठी लागेल एवढे पाणी सिंचनासाठी मिळावे, अशी मागणी नोंदविण्याची गरज आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाडय़ातील आंदोलनांचे स्वरूप आकसू लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 10th Oct 2013 रोजी प्रकाशित
समन्यायी वाटपाला ‘वळण’
जायकवाडी जलाशयात ३३ टक्क्य़ांपर्यंत पाणी नसेल, तर टक्केवारीत तेवढाच आकडा गाठता यावा, एवढेच पाणी नगर व नाशिक जिल्ह्य़ांतून सोडण्याच्या हालचाली जलसंपदा विभागात सुरू झाल्या आहेत.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 10-10-2013 at 01:50 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Turn to equipped distribution