महाराष्ट्र राज्य टंकलेखन व लघुलेखन शासनमान्य संस्था संघटनेतील पदाधिकारी स्वत:चे सत्कार मंत्र्यांकडून करवून घेण्यासाठी अवैधरित्या पैसे मागून टंकलेखन संस्थांना ब्लॅकमेल करीत असल्याचा आरोप विदर्भातील काही टंकलेखन संस्था चालकांनी केला आहे.
मुंबई येथे अस्तित्वात असलेल्या टंकलेखन व लघुलेखन शासनमान्य संस्थांच्या संघटनेने स्वत:ची पाठ थोपटण्यासाठी परवा २० ऑक्टोबरला नागपुरात कार्यक्रम आयोजित केला. मुंबईच्या धर्मदाय आयुक्त कार्यालयाची परवानगी न घेता, विदर्भातील संस्थाचालकांना विश्वासात न घेता ‘विदर्भ टंकलेखन संघटना’ यांना समोर करून रविवारी क्रीडा चौकातील ईश्वर देशमुख सभागृहात हा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सत्कारमूर्तीमधे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष सहस्त्रबुद्धे, आयुक्त शिवाजी पांढरे, राज्य संघटना अध्यक्ष प्रकाश कराळे, राज्य संघटनेचे माजी अध्यक्ष चांदीवाल यांचा समावेश आहे. यांच्या सत्कार समारंभासाठी बळजबरीने पैसा उकळण्याचा गोरखधंदा संघटनेचे पदाधिकारी करीत असल्याचा आरोप नागपूरच्या टंकलेखन संस्था चालकांनी केला आहे.
शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा आणि शिक्षण संचालक (प्राथमिक) महावीर माने यांच्या सहकार्याने राज्यातील टंकलेखन संस्थांना मोठी संजीवनी मिळाली. संगणक संस्थांच्या माध्यमातून ज्या प्रमाणे ‘एमएचसीईटी’ हा अभ्यासक्रम सक्तीचा करण्यात आला. त्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने टंकलेखन संस्थांना टंकलेखन-संगणक अभ्यासक्रम ‘जीसीसी-टीबीसी’ म्हणजे गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स हा एक नवीन अभ्यासक्रम आणला आहे.
जीसीसी-टीबीसी हा अभ्यासक्रम घेण्याची परवानगी टंकलेखन संस्थांची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिली आहे. या संधीची फायदा घेऊन टंकलेखन संस्थाधारकांच्या राज्य संघटनेने नागपूर विभाग व जिल्ह्य़ातील प्रत्येक संस्थाचालकाकडून २५०० रुपय घेण्याची सक्ती केली आहे. तसेच हे पैसे न भरल्यास जीसीसी-टीबीसी अभ्यासक्रमाची मान्यता त्या त्या संस्थेला दिली जाणार नाही, अशी हूलही उठवण्यात आली आहे.
पुणे येथील परिषदेचे अध्यक्ष व आयुक्त(सत्कारमूर्ती) यांना अंधारात ठेवून तसेच प्रमुख पाहुणे असलेले शिक्षण उपसंचालक व जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांची नावे समोर करून गरीब टंकलेखन संस्थाचालकांवर अन्याय असल्याचे नागपुरातील टंकलेखनधारकांचे म्हणणे आहे.
शिक्षणाच्या समान हक्काची पायमल्ली करून हा अभ्यासक्रम टंकलेखन संस्थाच मिळवून देणार आहे व तो मिळण्यासाठी संघटनेचे शिफारस उपयोगी पडणार आहे, असे भासवून टंकलेखनधारकांकडून पैसे उकळण्याचा थेट आरोप करण्यात आला आहे. जमा झालेला पैसा मंत्रालयात द्यायचा आहे, असेही सांगितले जात आहे.