शहरात वाहतुकीची सर्वाधिक समस्या व्हरायटी चौक आणि राणी झांशी चौकात उद्भवत आहे. अत्यंत व्यग्र रहदारी आणि जड वाहनांचा वावर असलेले दोन्ही रस्ते लोकांसाठी प्रचंड तापदायक ठरत असून फुटपाथवरील आक्रमणांनी या समस्येत दिवसेंदिवस भर पडत चालली आहे.
स्टार बसेसची वर्दळ, ऑटोरिक्षा चालकांची दादागिरी रोजचीच झाली आहे. याविषयी तक्रारी केल्यानंतरही कोणत्याही प्रकारे दखल घेतली गेलेली नाही. पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या प्रकारांमुळे सामान्य नागरिक अक्षरश: वेठीस धरले जात आहेत. ऑटोरिक्षा चालक रस्त्यात कुठेही ऑटो उभे करून ठेवतात. चुकीच्या बाजूने वाहने काढतात. रस्त्यावरून जाणाऱ्यांना सक्तीने ऑटोत बसण्यात भाग पाडतात, अशा तक्रारींची संख्या सर्वाधिक आहे. विशेषत: महिला आणि महाविद्यालयीन तरुणींना या प्रकारांमुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो.
व्हरायटी चौक ते झांशी राणी चौक या रस्त्यावरील फुटपाथ अतिक्रमणांचे माहेरघर झाले आहेत. पिवळी रेषा ओलांडून दुकानदारांनी आपल्या वस्तू थेट रस्त्यावर विक्रीसाठी ठेवल्याचे दृश्य नेहमीचेच झाले आहे. विशेषत: मोरभवन बस स्थानकाजवळ ही समस्या जाणवते. या परिसरातील शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये नागपूर सुधार प्रन्यासने दुकानदारांना जागा देऊनही त्यांचे अतिक्रमण थांबलेले नाही. काहींनी कॉम्प्लेक्समधील दुकाने भाडय़ाने देऊन फुटपाथवरही स्वतंत्र दुकाने ठेवली आहेत. फुटपाथवरील विक्रत्यांच्या भाऊगर्दीत पादचाऱ्यांसाठी जागाच राहिलेली नाही. अनेक हातठेलेवाले बिनधास्तपणे रस्त्यावर उभे दिसतात. पाणीपुरी, छोटय़ा वस्तू आणि खाद्यपदार्थाच्या ठेल्यांची संख्या यात मोठय़ा प्रमाणात आहे.
ज्या फुटपाथधारकांना व्यावसायिक संकुलात जागा देण्यात आली होती. त्यांची चौकशी करण्याची गरज निर्माण झाली असून महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाचा नांगर फिरल्यानंतरच परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे. महापालिका याची गंभीर दखल घेत नसल्याने अतिक्रामकांची हिंमत दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. पादचाऱ्यांकडूनही वाहतुकीचे नियम सर्रास मोडले जातात. वाहतूक सिग्नल सुरू झाल्यानंतर पादचारी जत्थ्याने रस्ता ओलांडतात. यामुळे वाहनधारक भांबावून जातात. याची परिणिती एखाद्या दुर्घटनेत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.