जिल्ह्य़ातील वजनदार नेते विलास खरात दुसऱ्यांदा काँग्रेस पक्षातून बाहेर पडले आहेत. आपली पुढील दिशा त्यांनी अजून जाहीर केली नाही. मात्र, त्याबाबत जिल्ह्य़ातील, प्रामुख्याने घनसावंगी, अंबड तालुक्यांतील राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आहे.
यापूर्वी २००४ मध्ये जालना लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यामुळे खरात यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. परंतु तेथे भ्रमनिरास झाल्यामुळे दोन-सव्वा दोन वर्षांनी ते स्वगृही म्हणजे काँग्रेसमध्ये परतले. आता दुसऱ्यांदा त्यांनी पक्षत्याग केला असला, तरी पुढील दिशा मात्र स्पष्ट केली नाही. सन १९८५ मध्ये अंबडमधून काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभेवर निवडून येण्यापूर्वीच त्यांनी बाळासाहेब पवार यांच्या पाठिंब्यावर अंकुशराव टोपे यांच्या विरोधात राजकारण सुरू केले. १९८५ व १९९० या दोन निवडणुकांत विधानसभेवर निवडून गेलेले खरात त्यानंतरच्या निवडणुकीत मात्र पराभूत झाले होते. दशकभर आमदार म्हणून कार्यरत असतानाच्या काळात जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष, जिल्हा सहकारी दूध संघाचे अध्यक्ष आदी पदांवर ते राहिले. जालना जि. प. च्या पहिल्या निवडणुकीत खरात यांच्यावर टोपे यांनी मात केली होती. जि. प. च्या दुसऱ्या निवडणुकीत पक्षात तिकीटवाटपात अन्याय झाल्याचे कारण पुढे करून त्यांनी आपल्या समर्थकांना अपक्ष म्हणून उभे केले. यापैकी निवडून आलेल्या काहींनी पुढे जि. प. त शिवसेना-भाजप युतीची सत्ता आणण्यात हातभार लावला होता. याच काळात जालना जिल्हा बँक भाजप-शिवसेनेच्या अधिपत्याखाली ठेवण्यात खरात समर्थकांचाच आधार होता. याच काळात खरात यांना काँग्रेसमधून निलंबित केल्याचे वृत्तही प्रसिद्ध झाले होते. परंतु त्यानंतरही ते काँग्रेसमध्येच होते.
राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यावर टोपे त्या पक्षात गेले. त्यामुळे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष म्हणून काम करताना खरात यांच्यासमोर मोठा अडसर राहिला नव्हता. परंतु तरीही जिल्ह्य़ातील काँग्रेस पक्ष संघटनेवर एकछत्री अंमल मात्र त्यांना ठेवता आला नाही. जिल्हा बँकेचे अध्यक्षपद खरात यांनी टोपेंवर मात करून मिळविले होते. परंतु या संस्थेच्या कारभारावरून त्यांना नेहमीच टीकेचे धनी व्हावे लागले. खरात यांच्या राजकीय विरोधकांनी त्यांच्यावर कायमच आरोपांच्या फैरी सुरू ठेवल्या.
जवळपास ३ दशके जालना जिल्ह्य़ाच्या राजकारणात आपले अस्तित्व ठेवण्याचे काम खरात यांनी केले. अंकुशराव टोपे यांच्याशी स्पर्धा करण्यात खरात यांचा आतापर्यंतचा काळ गेला. गेल्या काही वर्षांत जिल्ह्य़ातील काँग्रेस पक्ष संघटनेत त्यांचा वावर कमी-अधिक राहिला. मागील तीन-चार महिन्यांत दुष्काळी भागाचे दौरे करून जनतेचे प्रश्न शासनदरबारी मांडण्याचे काम त्यांनी केले.
आता काँग्रेसचा त्याग केल्यावर ते कुठे जाणार याची चर्चा आहे. त्यांचे मूळ गाव असलेला घनसावंगी तालुका परभणी लोकसभा मतदारसंघात असून ती जागा आघाडीत राष्ट्रवादीकडे असल्याने त्या तिकिटावर खरातांचा डोळा आहे का? मराठवाडय़ातील अदलाबदलीत जालना लोकसभेची जागा खरेच राष्ट्रवादीकडे आली तर त्यावर खरातांची नजर आहे का? की दोन काँग्रेसचा राजीनामा दिलेल्या आणि एकदा भाजपमध्ये जाऊन आलेल्या खरात यांच्यासमोर आणखी एखादा पक्ष आहे काय? असे प्रश्न जिल्ह्य़ातील राजकीय वर्तुळात उपस्थित केले जात असून खरात मात्र आपली पुढील दिशा स्पष्ट करण्यात विलंब लावीत आहेत.
  संग्रहित लेख, दिनांक 18th May 2013 रोजी प्रकाशित  
 विलास खरात दुसऱ्यांदा काँग्रेसमधून बाहेर!
जिल्ह्य़ातील वजनदार नेते विलास खरात दुसऱ्यांदा काँग्रेस पक्षातून बाहेर पडले आहेत. आपली पुढील दिशा त्यांनी अजून जाहीर केली नाही.
  First published on:  18-05-2013 at 01:45 IST  
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा.  मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News)  वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vilas kharat quits congress second time