यवतमाळ जिल्ह्यात दारुबंदी करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी महिलांच्या विविध संघटनांनी सोमवारी वणी येथे काढलेल्या भव्य मोर्चाला अनेक व्यक्ती, संस्था आणि स्वयंसेवी संघटनांनी प्रचंड प्रतिसाद देत सारे वणी शहर दणाणून सोडले. संगीता पवार आणि उमेश मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली जैताई मंदिरापासून निघालेला मोर्चा उपविभागीय अधिकारी शिवानंद मिश्रा यांच्या कार्यालयावर धडकला. विशेष म्हणजे स्वत मिश्रा यांनी मोर्चाला सामोरे जात मागण्यांचे निवेदन स्वीकारले.
भारतीय सन्यात अधिकारी राहिलेल्या आपल्या वडीलांना जडलेल्या दारुच्या व्यसनाने सारे कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचा अनुभव पदरी असल्याने यापुढे इतरांचे संसार दारूच्या व्यसनापायी नेस्तनाबूत होऊ नये, यासाठी संगीता पवार हिने पदर खोचून जिल्हाभर दारुबंदीच्या मागणीसाठी ठिकठिकाणी महिलांचे प्रचंड आंदोलन उभारले आहे. २० एप्रिलला यवतमाळात रखरखत्या उन्हात आणि २६ एप्रिलला मोहद्यात डांबर रस्त्याचे चटके खात महिलांनी भव्य मोच्रे काढले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, जिजाऊ बिग्रेड, मनसे, मराठा सेवा संघ, शेतकरी संघटना इत्यादी पक्ष आणि संघटनांनी हे अपूर्व आंदोलन उचलून धरले आहे. मोर्चाचे नेतृत्व महिला करीत असल्या तरी पुरुषांचाही सहभाग मोठय़ा प्रमाणात मिळत आहे. वणीतील मोर्चात १५ हजारावर लोक सहभागी झाल्याचा आंदोलकांचा दावा आहे.
वणीतील या विराट मोर्चात गुरुदेव सेवा मंडळाचे पुंडलिक मोहीतकर, प्रमोद शेडकर, लिला दहीकर, दारुबंदी व व्यसनमुक्ती आंदोलनाचे नेते ज्येष्ठ सामाजिक कार्यकत्रे राजू निमसटकर, रुद्रा पाटील कुचनकार, निलिमा काळे, जि.प. सदस्य दिलीप कावळे, सुधीर मते, पुंडलिक अजय धोबे, सतीश कोंगेरे  आणि असंख्य रणरागिणी व कार्यकत्रे प्रामुख्याने स्वखर्चाने सहभागी झाले होते.
कसली आली परंपरा?
कुठल्याही आंदोलकांना सामोरे न जाता त्यांच्या शिष्टमंडळाशी आपल्या कार्यालयातच चर्चा करून मागण्यांचे निवेदन स्वीकारण्याची शासकीय परंपरा यावेळी तोडण्यात महिलांना यश आले. उपविभागीय अधिकारी शिवानंद मिश्रा यांनी मोर्चाला सामोरे जात निवेदन स्वीकारले. विशेष हे की, संगीता पवार आणि उमेश मेश्राम यांनी दोन दिवस अगोदरच या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यांच्या भावनेची कदर करत मिश्रा यांनी स्वत निवेदन स्वीकारल्याने त्यांच्याही मानवतावादी दृष्टीकोनाचे कौतुक होत आहे. मुख्यमंत्री जर पोलीस सलामीची फाजील व अगाऊ परंपरा तोडू शकतात, तर महिलांच्या रखरखत्या उन्हातील आंदोलनाला  सामोरे जाण्यात बिघडले काय, असा सामान्य माणसाचाही रास्त सवाल आहे.