स्कंदमाता ही पाचव्या दिवसाची देवता. स्कंदमाता विशुद्ध नावाच्या चक्राशी संबंधित आहे. या देवीमध्ये मुख्य भाव मातृत्वाचा आहे, शिवाय ती स्कंदमाता आहे. स्कंद म्हणजे कार्तिकेय. स्कंद जन्मासाठी तीनही जग आसुसलेलं होतं. शिवपार्वतीचा पुत्रच माजलेल्या तारकासुराचा वध करील अशी भविष्यवाणी होती; परंतु शिव पडला तपस्वी. तो कसा काय पार्वतीशी विवाह करणार? परंतु शैलपुत्री पार्वती ब्रह्मचारिणी झाली आणि तिच्या दृढ निश्चयामुळे शिवाने तिच्याशी विवाह करायचे ठरवले. पार्वतीने विवाहाच्यावेळी चंद्रघंटेचे आकर्षक रूप घेतले, त्यानंतर ती कूष्माण्डा झाली. त्यानंतर स्कंदमाता झाली.
रुद्रासंबंधी देवतांचा वैदिक साहित्यात मनापासून स्वीकार झाला नाही हे खरे. स्कंद हा चोराचिलटांचा राजा असे वेदातले संदर्भ आहेत. परंतु नंतरच्या साहित्यात मात्र या देवतांना सन्मानाचे स्थान मिळाले. त्यानंतर शिवपार्वती विवाह, स्कंदजन्म, इ. कथा महाभारत, रामायण, ब्राह्मपुराण, कालिकापुराण आणि शिवपुराण, स्कंदपुराण इ. ग्रंथांमध्ये आल्या.
मूर्तींच्या दृष्टीने विचार करता सिंहवाहिनी देवीच्या मूर्ती कुषाण काळात (इ.स. चे पहिले ते तिसरे शतक) मिळतात. ही देवी ‘नाना’ या नावाने प्रसिद्ध होती. ऋग्वेदात आई या अर्थी ‘नना’ शब्द आला आहे. ‘माझी आई पाट्यावरवंट्यावर वाटते’. अशा अर्थाचे एक वाक्य ऋग्वेदात आहे ‘उपलपेषिणी नना’. या शब्दाचा कुषाणकाळातल्या नाना या देवीशी संबंध असावा का माहीत नाही.
कधी कधी ही नाना कुषाणकालीन नाण्यांवर दिसते तर कधी शिवाबरोबरोबर त्यांची पत्नी म्हणूनही चित्रित केलेली दिसते. ओ मा नावाची देवी अवैदिक धर्मामध्ये प्रचलित होती. त्यावरूनच ‘उमा’ शब्द आला आहे. ओमा या शब्दाचा अर्थ ‘श्रेष्ठ आई’ असा असला तरी उमा शब्दांची व्युत्पत्ती संस्कृत ग्रंथांमध्ये नेमकी दिलेली नाही. ‘तू तपश्चर्येसाठी जाऊ नकोस’ असे पार्वतीची आई मेना तिला म्हणाली आणि त्यावरून उमा हे पार्वतीचे नाव प्रसिद्ध झाले असे कालिदास कुमारसंभवात सांगतो.
डॉ. नी. पु. जोशी यांच्या निरीक्षणानुसार गुप्तकाळात ( इ.स. ३२०-इ.स. ५५०) दोन हात असलेल्या सिंहवाहिनी देवीच्या दोन प्रकारच्या मूर्ती मिळतात. एका हातात भाला घेतलेली सिंहारूढ देवी आणि दुसरी सिंहारूढ देवीच्या कुशीत स्कंद असलेली मूर्ती. ही स्कंदमातेची मूर्ती आहे. यावरून निदान मूर्तिकलेमध्ये स्कंदमाता ही देवता गुप्तकाळापासून दिसते.
स्कंद् या धातूचा अर्थ सांडणे. शंकराचे वीर्य सांडले, ते अग्नीचे स्वीकारले आणि गंगेमध्ये विसर्जित केले. गंगेमध्ये स्नान करण्यासाठी कृत्तिका आल्या होत्या. मेघयन्ती, शीकयन्ती इ. सहा कृत्तिकांच्या पोटी त्याचा जन्म झाला म्हणून त्याला कार्तिकेय म्हणतात. सांडलेल्या वीर्यापासून जन्मला म्हणून स्कंद म्हणतात. कृत्तिकांनी ते वीर्य गंगेकाठच्या शरवणामध्ये ठेवले. आणि त्यापासून हा पुत्र जन्मला. शिवाच्या वीर्यापासून जन्मला म्हणून तो शिवाचा आणि पर्यायाने पार्वतीचा पुत्र होतो.
स्कंद किंवा कार्तिकेय ही युद्ध देवता आहे. युद्ध देवता नेहमी वयाने लहान किंवा तरूण दाखवतात. याने तारकासुराचा वध केला तेव्हा तो फक्त सहा दिवसांचा होता. सहा कृत्तिकांच्या पोटी जन्माला आला म्हणून तो षण्मुख ( सहा तोंडे असलेला) आहे. एवढा पराक्रमी पुत्र पोटी आला म्हणून साहजिकच त्याच्या आईला देवतागणामध्ये स्थान मिळाले असावे.
सिंहासनगता नित्यं पद्माश्रितकरद्वया।
शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी।।
(नेहमी सिंहावर आरूढ होणारी)