डॉ. निर्मला रवींद्र कुलकर्णी
नवदुर्गांमध्ये सहाव्या दिवसाची देवी म्हणून समाविष्ट झालेली ही देवी खूपच प्राचीन आहे. हिचा उल्लेख दुर्गेच्या संदर्भात तैत्तिरीय आरण्यकामध्ये आला आहे. म्हणजे सुमारे इ.स.पू. ७०० च्या आसपास. पण त्याठिकाणी ‘कात्यायनाय’ असे पुंलिंगी रूप येते. हरिवंशामध्ये कात्यायन ऋषींची माहिती मिळते. कति नावाच्या विश्वामित्राच्या पुत्रापासून कात्यायन ऋषी जन्मले. त्यांची कन्या ती कात्यायनी अशी या नावाची व्युत्पत्ती सांगणारी एक कथा वामन पुराणात आली आहे.
महिषासुराने देवांचा पराभव केल्यावर देवांचा राग अनावर झाला. त्या सर्व देवांच्या मुखामधून तेज बाहेर पडले. हे तेज कात्यायन ऋषींच्या तपस्येच्या तेजात मिसळले आणि त्यापासून एक दैवी स्त्री तयार झाली तीच ही कात्यायनी.
दुर्गेचा आणि अग्नीचा संबंध आहे, ती अग्नीपासून विकसित झाली आहे. अग्नी आणि दुर्गा दोघेही प्रखर. या प्रखर दुर्गेचंच कात्यायनी असं एक नाव आहे. पार्वतीच्या नामावळीमध्ये अमरकोश ( इ.स.२००) हिचा नामनिर्देश करतो तो पुढीलप्रमाणे –
उमा कात्यायनी गौरी काली हेमावती ईश्वरी। शिवा भवानी रुद्राणी शर्वाणी सर्वमङ्गला।।
पार्वतीने म्हणजे अंबिकेने असुरांचा नाश करण्यासाठी आपल्या शरीरापासून अनेक देवी निर्माण केल्या, त्यातलीच एक कात्यायनी. हे पार्वतीचे रूप महिषासुर वधाच्या संदर्भात येते. महिषासुरमर्दिनीची अनेक शिल्पे कात्यायनी म्हणून ओळखली जातात. कात्यायनीला दहा हात असतात. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीनही देवांचे गुण तिच्यात एकवटले आहेत. तिच्या मस्तकी जटा असतात आणि त्यामध्ये ती चंद्रकोर माळते. तिचे डोळे खूप सुंदर असतात आणि तिने नुकतेच तारुण्यात पदार्पण केलेले असते.
तिचा नवदुर्गा या मालिकेत प्रवेश झाला तेव्हा अर्थातच तिची समाज मनातली ओळख बदलली. इथे ती मध्यमवयीन स्त्री म्हणून येते. कारण साधारणतः लाल वस्त्र नेसलेल्या मध्यमवयीन स्त्रीला कात्यायनी म्हणत असत. या देवी स्त्रीच्या आयुष्यातल्या अवस्थानुरूप असल्यामुळे स्कंदमातेनंतर मध्यमवयीन कात्यायनी आली असावी. या नवदुर्गेचा श्लोक पुढीलप्रमाणे आहे –
चंद्रहासोज्ज्वलकरा शार्दूलवरवाहना।
कात्यायनी शुभं दद्यात् देवी दानवघातिनी।।
(चंद्रहासा म्हणजे आल्हादक हास्य असणारी, तेजस्विनी, श्रेष्ठ वाघावर आरूढ होणारी दानवाचा नाश करणारी ही देवी कात्यायनी माझे कल्याण करो.)
स्त्रीत्व जपणे आणि अन्यायाविरुद्ध लढणे हे दोन्ही गुण पार्वतीमध्ये, दुर्गेमध्ये आहेतच. कात्यायनीकडेही हे गुण आहेत. ती चंद्रहासा आहे म्हणजे तिचं हास्य दशदिशा उजळून टाकणारं आहे, सौम्य आहे, आकर्षक आहे. ती उज्ज्वलकरा आहे. कर म्हणजे किरण. तिचे किरण, तिचं तेज झाकोळलेलं नाही, ते स्वच्छ आहे. ती वाघावर आरूढ झाली आहे. आणि तिने एका राक्षसाला मारलं आहे.
काय शिकवते ही कात्यायनी? स्त्री प्रमाणे वागा. सौम्य असणं, दुसऱ्याला आनंदी होईल असं वागणं हा स्त्रीचा गुण मानला गेलाय. तो गुण वस्तुतः कोणतीही व्यक्ती, मग ती स्त्री असो किंवा पुरुष, स्वीकारू शकते. उगाचच अरेरावी करण्याचं, उर्मटपणे वागण्याचं काहीच कारण नाही.
मनमिळाऊपणा, आकर्षकता कात्यायनीकडे आहेतच. पण मुख्य म्हणजे ती दानवघातिनी आहे. हे तिचं विशेषण खूप काही शिकवून जाते. हा दानव, हा राक्षस कालानुरूप रूपे बदलत असतो. प्राचीन काळापासून, म्हणजे अगदी लग्नसंस्था अस्तित्वात येण्याच्या अगोदरपासून हा दानव म्हणजे पुरुषांची नजर स्त्रीला उपभोग्य वस्तू म्हणून पाहतो आहे.
एकदा बसमध्ये एक मध्यमवयीन प्राध्यापक बाई चढल्या. एका पुरुषाजवळ जागा होती. साहजिकच, तिथं बसल्या. थोड्याच वेळात तिथून उठल्या आणि उभ्या राहिल्या. मग एक सुसंस्कृत तरुणी चढली. तीही सुरुवातीला बसली, नंतर उभी राहिली. मग एक अशिक्षित कामगार बाई चढली. तिने थोड्याच वेळात जागा बदलण्याऐवजी त्या पुरुषाला चांगलंच फैलावर घेतलं. हे दुर्गेचं रूप नाही काय? मला स्वतःला तर हीच दुर्गा वाटते.
अशी एकही स्त्री नसेल की जिनं पुरुषांच्या वाईट नजरेचा अनुभव घेतला नसेल. पण त्यातल्या किती जणी बोलतात? अन्याय होत असेल तर तो सहन करू नका. त्याला वाचा फोडा आणि त्यांचं मूळ नष्ट करण्याचा प्रयत्न करा हेच ही कात्यायनी सांगते. प्रत्येक स्कंदमातेनं आपल्या मुलाला ‘स्त्रीकडे एक व्यक्ती म्हणून बघ, उपभोग्य वस्तू म्हणून पाहू नकोस ‘ असं शिकवलं तर अशाप्रकारचे निदान दहा टक्के तरी प्रश्न संपतील. अन्यायाविरुद्ध लढा असा संदेश या सर्वच दुर्गा देतात. संस्कृतीमधल्या अशा कथांकडे डोळसपणे पाहिलं तर त्या कथा निरर्थक होत नाहीत.