आराधना जोशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एका कार्यक्रमात संगीतकार अमितराज यांनी आदेश बांदेकर यांचे जाहीर आभार मानले. याचं कारण सांगताना त्यांनी खुलासा केला होता की, “माझे आईवडील दोघेही सरकारी नोकरीत. त्यामुळे साहजिकच मीसुद्धा सरकारी नोकरीत जावं असं पालकांना वाटत होतं. मात्र माझं मन संगीत क्षेत्रात करिअर करण्यासाठी ओढ घेत होतं. त्यामुळे घरात कायम संघर्ष सुरू होता. नेमकं त्याच काळात माझ्या आईची आदेशदादाबरोबर भेट झाली. तिनं सगळी परिस्थिती दादाच्या कानावर घातली. त्यावर दादानं आईला सांगितलं होतं की मुलाच्या परीक्षेतल्या गुणांपेक्षा त्याच्या अंगी असणाऱ्या गुणांना जास्त महत्त्व द्या. त्यामुळे त्याच्या मनासारखं करिअर घडेल. तुमचा पाठिंबा कायम ठेवा. दादाच्या या उद्गारांनंतर पालकांचा विरोध कायमचा मावळला.” आपल्या पाल्यानं आयुष्यात कोण व्हावं, याचा विचार अनेकदा पालकच करताना दिसतात. पाल्य संशोधक, संगीतकार, गायक, खेळाडू, कलाकार होऊन कितीसे पैसे मिळणार आहे? त्यापेक्षा डॉक्टर, इंजिनिअर व्हावे, नेहमी गुणवत्ता यादीत यावं, परदेशात जाऊन भरपूर पैसे मिळवावेत, शक्य असेल तर कायमस्वरूपी परदेशातच स्थायिक व्हावं अशीच अनेक पालकांची तीव्र इच्छा असते. त्यांच्या दृष्टीने असं आयुष्य म्हणजे सुखी आणि यशस्वी जीवन.

आपल्या पाल्यानं नियमित अभ्यास करावा, प्रत्येक परीक्षेत प्रत्येक विषयात उत्तम गुण मिळावेत, सर्व विषय त्याला उत्तमरित्या कळावेत अशी अपेक्षा सर्वच पालकांची असते. ही अपेक्षा शिक्षकांकडून पूर्ण व्हाव्यात अशीही पालकांची इच्छा असते. अपेक्षा ठेवणं चुकीचं नाही; मात्र या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पालकांचाही सहभाग, त्यांचे सहकार्य असणं गरजेचं असतं याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केलं जातं. शाळा, कॉलेजमध्ये प्रत्येक वर्गात असणारी विद्यार्थीसंख्या ही दरवर्षी वाढणारी आहे. शिक्षकांना अनेक वर्गांमध्ये अनेक विद्यार्थ्यांना शिकवायचं असतं. नेमक्या काळात अभ्यासक्रम पूर्ण करायचा असतो. परीक्षा घेणं, पेपर तपासणं, निकाल तयार करणं, स्नेहसंमेलन, सहली या सगळ्यात इच्छा असूनही शिक्षकांना प्रत्येक विद्यार्थ्यांकडं लक्ष देता येत नाही. यासाठीच पालकांचाही पाल्याच्या प्रगतीत हातभार लागणं आवश्यक आहे. मात्र हा हातभार सकारात्मक असणं अत्यंत गरजेचं आहे.

हेही वाचा >> मुलांना हवं ते देता, सगळे हट्ट पूर्ण करता? पालक म्हणून तुम्ही ‘हा’ दृष्टीकोन बदलणे गरजेचे

पाल्य किंवा विद्यार्थी लहानपणापासूनच ज्या परिवारात, ज्या वातावरणात वाढतात त्याचा काही ना काही परिणाम त्यांच्यावर कळत नकळत होत असतात. म्हणूनच विद्यार्थ्याची शैक्षणिक प्रगती होण्यासाठी घरातही पोषक वातावरण असणं आवश्यक असतं. शाळा, महाविद्यालयात जेवढा वेळ विद्यार्थी असतात त्यापेक्षा जास्त काळ ते आपल्या घरी असतात. म्हणूनच आईवडिलांचा शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा आहे, घरातील इतर सदस्य शिक्षणाला किती महत्त्व देतात, पाल्याच्या शैक्षणिक विकासाकडे पालक सातत्यानं लक्ष देतात का, यासारख्या गोष्टींवरही विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती अवलंबून असते. त्यामुळे पाल्याच्या अपयशासाठी एकट्या शिक्षकांनाच दोषी मानता येणार नाही. पाल्याची शैक्षणिक प्रगती जर उत्तम हवी असेल तर, घरातच त्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.

अनेक विद्यार्थ्यांच्या घरी शिक्षणाला पोषक वातावरणच नसतं. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतही पालक विद्यार्थ्यांसाठी कर्ज काढून शिकवत असतात. अभ्यासासाठी वेगळी खोली, नवी कोरी पुस्तके यासारखी ‘चैन’ त्यांना परवडणारी नसते. अशा परिस्थितीत विद्यार्थी अभ्यास करताना तरी घरात तेवढा वेळ शांतता ठेवली जाईल, याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. याशिवाय त्याच्या अभ्यासातलं काही कळतच नाही, असं म्हणण्यापेक्षा तो काय शिकतोय, जे शिकतोय ते त्याला समजतंय का? अशी साधी चौकशीही त्या पाल्याला नवा हुरूप देते. अनेकदा जबरदस्ती करून, मागे लागून, शिक्षा करून आईवडील विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लावण्याचा प्रयत्न करतात. हा जुलमाचा रामराम काही काळ विद्यार्थी सहन करतात मात्र हळूहळू हा प्रवास बंडाच्या दिशेने वाटचाल करू लागतो. यापेक्षा जर विद्यार्थी अभ्यासाकडे दुर्लक्ष करतोय असं पालकांच्या लक्षात आलं तर, त्याची रुची वाढावी, यासाठी पालकांनी स्वतःहून प्रयत्न करून पाल्याला सकारात्मक मार्गानं समजावून सांगणं अत्यंत महत्त्वाचे आहे.

हेही वाचा >> मुलांच्या मनात अभ्यासाविषयी प्रेम कसं निर्माण करायचं? ‘या’ सोप्या ट्रीक्सने लागेल अभ्यासाची गोडी

स्टीव्हन रुडाल्फ यांनी ‘टेन लॉज ऑफ लर्निंग’ या पुस्तकात पालकांसाठी अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन तत्त्वं सांगितली आहेत – १. मुलांना स्वतःविषयी काळजी घ्यायला शिकवा २. मुलांना स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवायला शिकवा ३. मुलांना जिज्ञासू व शोधक बनवा ४. मुलांना आयुष्यात स्वतःचं ध्येय, उद्दीष्ट ठरवायला शिकवा ५. मुलांना विषयानुरूप योजना बनवायला शिकवा ६. मुलांना विविध खेळांचे मूलभूत नियम शिकवा ७. मुलांना प्रत्यक्ष कृती व सराव करायला शिकवा ८. मुलांना व्यवहारज्ञान शिकवा ९. मुलांना नियमानुसार, शिस्तबद्ध वागायला, खेळायला शिकवा १०. मुलांना नेहमी विजेत्यासारखे वागायला शिकवा.

हेही वाचा >> आई-वडिलांचा स्वभाव, हावभाव अन् बोलणं न्याहाळत असतं तान्ह बाळ; पालक म्हणून वावरताना ‘ही’ काळजी घ्याच!

हे नियम जर नीट वाचले तर त्यांचा परस्पर संबंध आहे हे लक्षात येईल. कोणतेही पालक हे मुलांचे पहिले गुरु, शिक्षक, मार्गदर्शक असतात. याचं भान ठेवून जर प्रत्येक पालकानं आपल्या पाल्याला योग्य मार्ग दाखवला तर त्याचा फायदा आपल्याच पुढच्या पिढीला होणार हे नक्की!

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The world is beyond exams and marks parents teach their children these things and make these changes in themselves sgk
First published on: 03-02-2024 at 16:42 IST