बलात्काराच्या खटल्यातील पीडीतेच्या साक्षीचे महत्त्व अधोरेखित करणारा म्हणून हा निकाल अत्यंत महत्त्वाचा आहे. वैद्यकीय तपासणी आणि पुरावे हा महत्त्वाचा भाग असला तरी तो निर्णायक नव्हे हे.देखिल या निकालाने स्पष्ट केलेले आहे. बलात्कार प्रकरणातील पीडीतेला त्यातही अल्पवयीन पीडीतेल साक्ष देणे हे मूळातच कठीण आहे यात काही वाद नाही आणि त्यामुळेच साक्षीत बारीक सारीक दोष राहू शकतात. खोटी साक्ष देताना जाणिवपूर्वक सगळ्या गोष्टींची सफाईदारपणे साक्ष दिली जाते. या उलट साक्षीतील बारीक सारीक दोष हे सत्य साक्षेची ग्वाही देत असतात.

फौजदारी कायद्यानुसार आरोपीला शिक्षा ठोठावण्याकरता त्याच्यावरील आरोप साक्षीपुराव्यांसह सिद्ध होणे गरजेचे असते. यात साक्ष आणि पुरावे हे दोन्ही महत्त्वाचे आहेत. साक्ष आणि पुरावे परस्परपूरक असल्यास गुन्हा सिद्ध होण्याची शक्यता अधिक असते. मात्र साक्ष आणि पुरावे यात विसंगती असेल तर गुन्हा सिद्ध होणे कठीण बनते. बलात्कारासारख्या गंभीर आणि संवेदनशील प्रकरणात साक्ष आणि पुराव्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अशा एखाद्या प्रकरणात पुराव्यात, विशेषत: वैद्यकीय पुराव्यात काही दोष किंवा त्रुटी असतील तरीसुद्धा पीडीतेची प्रत्यक्ष साक्ष आणि त्याचे महत्त्व स्पष्ट करणारा महत्त्वाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच दिला.

या प्रकरणात १५ वर्षांची एक मुलगी घरात आपल्या ११ वर्षांच्या भावासोबत होती. आई-वडील गावाबाहेर गेले होते. शेजारचा आरोपी घरात आला, त्याने भावाला पान-मसाला आणायला पाठवले आणि मुलीवर जबरदस्ती केली. मुलीचा भाऊ परत आल्यावर त्याने बहिणीसोबत आरोपीला पाहिले. मुलगा आल्यावर आरोपी पळून गेला. मुलगी ताबडतोब जवळच्या नातेवाईकांकडे गेली, फोन करून आई-वडिलांना सांगितले आणि झाल्या प्रकाराबाबत पोलिसांत तक्रार नोंदवली, आणि त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला.सत्र न्यायालयात या प्रकरणाच्या सुनावणी अंती साक्षीपुराव्याच्या आधारे सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी ठरविले आणि १० वर्षांची सक्तमजुरी व दंड ठोठावला. त्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली. उच्च न्यायालयानेही सत्र न्यायालयाने दिलेली शिक्षा कायम ठेवली. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली.

सर्वोच्च न्यायालयाने – १. मुलीच्या शरीरावर जखमा नाहीत, त्यामुळे बलात्कार घडला नाही आणि मुलगी आणि तिच्या भावाच्या साक्षीत काही विरोधाभास आहेत आणि त्यामुळे आरोपीचा गुन्हा शंकेपलीकडे सिद्ध होत नाही असा आरोपीचा मुख्य बचाव आणि दावा आहे.

२. मुलीच्या शाळेचा दाखला आणि आई-वडिलांची साक्ष यावरून मुलगी १५ वर्षांची असल्याचे स्पष्ट झाल्याने या प्रकरणात पॉक्सो कायदा लागू होतो.

३. पीडीतेच्या साक्षीदरम्यान तिचे बोलणे नैसर्गिक आणि सुसंगत होतेच आणि तिच्या भावाच्या साक्षीतील घटनाक्रमसुद्धा त्याच घटनाक्रमाशी जुळला.

४. पीडीतेस प्रत्यक्ष जखमा नसल्या तरी बलात्कार झाला नाही असे म्हणता येत नाही, अनेक वेळा शरीरावर बाह्य जखमा दिसत नसल्या तरी जबरदस्ती आणि बलात्कार घडतो.

५. दोन साक्षीदारांच्या साक्षीत आणि बोलण्यात लहानसहान फरक असणे स्वाभाविक आहे, त्यावरून साक्ष बाद ठरत नाही, अशी महत्त्वाची निरीक्षणे नोंदविली आणि शिक्षा कायम ठेवली.

बलात्काराच्या खटल्यातील पीडीतेच्या साक्षीचे महत्त्व अधोरेखित करणारा म्हणून हा निकाल अत्यंत महत्त्वाचा आहे. वैद्यकीय तपासणी आणि पुरावे हा महत्त्वाचा भाग असला तरी तो निर्णायक नव्हे हे.देखिल या निकालाने स्पष्ट केलेले आहे. बलात्कार प्रकरणातील पीडीतेला त्यातही अल्पवयीन पीडीतेल साक्ष देणे हे मूळातच कठीण आहे यात काही वाद नाही आणि त्यामुळेच साक्षीत बारीक सारीक दोष राहू शकतात. खोटी साक्ष देताना जाणिवपूर्वक सगळ्या गोष्टींची सफाईदारपणे साक्ष दिली जाते. या उलट साक्षीतील बारीक सारीक दोष हे सत्य साक्षेची ग्वाही देत असतात. साक्षीदारसाक्ष आणि वैद्यकीय पुराव्यातील बारीक सारीक दोष आणि त्रुटी या आधारे गुन्हा शंकेपलीकडे सिद्ध न झाल्याच्या सबबीवर गुन्हेगाराला मोकाट न सोडणारा म्हणूनसुद्धा हा निकाल महत्त्वाचा ठरतो.