बुलढाणा : चिखली शहरातील एकाच समुदायातील दोन गटामध्ये क्षुल्लक कारणावरून तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये लाठ्या काठ्या, फायटर व कटर चा सर्रास वापर करण्यात आल्याने दोन्ही गटातील अनेक जण जखमी झाले आहे. घटनास्थळी, अंगूरका मळा परिसरात अजूनही तणाव आहे.

या घटनेप्रकरणी दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रारी दिल्या आहे. चिखली पोलिसांनी यावरून गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहे. पोलिसांनी अटक सत्र सुरु केले आहे. तपास पोलीस हवालदार सूर्यकला म्हस्के करीत आहे.

एका गटाकडून शेख रब्बानी शेख सांडू (वय ४३, रा. मस्जिद जवळ, चिखली) यांनी तक्रार दिली. त्यानुसार लग्नाचे निमंत्रण देण्याच्या कारणावरून आरोपीनी गैरकायदेशीर जमाव जमवला. त्यानंतर त्यांनी फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला केला, घरात शिरून महिलांनाही चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. घरातील वस्तूंचे नुकसान करून शिवीगाळ करत जीवाने मारण्याची धमकी दिली.

दुसऱ्या गटाकडून एजाज खान गनी खान (वय ४२, रा. अंगूरचा मळा, चिखली) यांनी तक्रार दिली. त्यानुसार रब्बानी उर्फ हब्बन शेख सांडू, शेख शकील शेख सांडू, शेख नाझीम शेख सांडू, शेख रेहान शेख अब्बन, शेख उबेद शेख राजिक, शेख नईम शेख सांडू, शेख वसीम शेख असीम आदींनी हातात फायटर, कटर, लाठ्या-काठ्या घेऊन त्यांच्या घरात घुसून त्यांना, मुलाला व भावाला जबर मारहाण केली. या मारहाणीत सर्वांना लाथा-बुक्क्यांनी, काठ्यांनी व धारदार शस्त्रांनी जखमी करण्यात आले. आरोपींनी घरातील सामानाची तोडफोड करत शिवीगाळ केली व धमक्या दिल्या.

परिसरात तणाव

या परस्पर हल्ल्यांमुळे शहरातील त्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी अतिरिक्त बंदोबस्त ठेवून गस्त वाढवली आहे. चिखलीतील दोन्ही गटांतील हा संघर्ष केवळ घटनेपुरता नाही. पोलिसांनी कठोर पावले न उचलल्यास अशा घटना पुन्हा होण्याची शक्यता नागरिक व्यक्त करत आहेत.